स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच केली होती. मात्र आता या पुतळ्यावरून काही ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हात लावला तर आमच्याशी गाठ आहे असा इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी राज्यात दंगल घडवून आणायची आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
राज्यात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा विषय तापला असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर असलेल्या कथित वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा प्रश्न उस्थित केला होता. तसेच कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नसलेला हा पुतळा रायगडावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यावरून आता बाळासाहेब दोडतले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, वाघ्या कुत्र्याचं इतिहासात मोठं योगदान आहे. होळकरांनी हा त्याचा जिर्णोद्धार केल्याने हा मुद्दासमोर आणला आहे का? हा प्रश्न आहे. तुम्ही इतिहास संपवण्याचं पाक करू नका. रायगड ही काही तुमची मक्तेदारी नाही, अशी टीकाही त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केली.
संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासाठी दिलेल्या ३१ मे पर्यंतच्या मुदतीवरूनही दोडतले यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहेत. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच वाघ्या कुत्र्याला हात लावणं तर सोडा, पण तिथपर्यंत पोहोचूही देणार नाही असा इशारा दोडतले यांनी दिला आहे.
दरम्यान, आम्ही वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या प्रकरणात कोर्टात जाऊ, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू, पण रायगडावरून हा पुतळा हटवू देणार नाही, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.