मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात असून, यात वाल्मिक कराड यांच्यावरही आरोप केले जात आहे. आरोपींना पकडले जात नसल्याबद्दल मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
परभणी येथील हिंसाचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांनी सोमनाथच्या कुटुंबीयांची बुधवारी (२५ डिसेंबर) भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी म्हणाले, "तपास जर जनतेने हातात घेतला ना, तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कळेल काय कचका असतो ते... ती वेळ देऊ नका. कारण मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या कॉल्सची माहिती (कोणी कोणाला पाठिंबा दिला आहे. कोणी कोणाला संरक्षण दिलं आहे. कोणत्या मंत्र्यांने, कोणत्या आमदाराने, कोणत्या खासदाराने कोणी काय पाठबळ दिलंय) घ्यायला तुम्हाला २० दिवस लागतात का?", असा सवाल मनोज जरांगेंनी सरकारला केला.
...तर बंदोबस्त मराठे करतील; मनोज जरांगे
"कुटुंबाची मागणी आहे ना चौकशीची, तर दणादण करायची. का करत नाहीत? त्याचं फळ यांना भोगावं लागेल. कुणाचाही बाप येऊ द्या. मी ते प्रकरण दबू देणार नाही. पूर्ण बाहेर काढणार आहे. तुमच्या चौकशीत जर सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, तर बंदोबस्त मराठे करणार", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
"मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून सहज जीव घेणार"
"मी एवढंच सांगतो की, तुम्हाला लागत नसेल, तर जनता तपास लावणार. इतका निर्घृण खून, त्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत. अरे ते चिलटे आहेत. तुम्हाला ते सापडेनात का? मी जे बोलतो, ते करतो. मी सुट्टी देत नाही. कारण तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात... मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही सहज जीव घेणार... कुठे पैसे देणार, कुठे नोकरी देणार. जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच? त्या आरोपीला अटक नाही होणार? कुटुंबाने ज्यांची जाहीरपणे नावे घेतली आहेत, ते तुरुंगातच पाहिजेत. मग कोणी असोत. कोणत्याही पदावर असोत. शासकीय पदावर असो, मंत्रिपदावर असो. तो गेलाच पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. नाही गेलं, याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागेल. मी तर सोडणारच नाही", असे मनोज जरांगे म्हणाले.