मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे या मागणीसाठी वादंग निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली. अनेकांना तडीपार करण्यात आले. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र पाठवून सत्तेचं ताम्रपट कुणीही घेऊन आलं नाही अशा शब्दात इशारा दिला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, या सरकारकडून राज ठाकरेंनी वेगळी अपेक्षाच ठेवू नये, इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं वाटलं नव्हतं. हे सरकार अक्षरश: लागूनचालन करतंय, हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला भरण्यापर्यंत मर्यादा सोडल्या आहेत. १२ दिवस खासदार-आमदारांना जेलमध्ये ठेवतात त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. या सरकारविरोधात आम्ही लढतोय. त्यांनीही लढलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर त्यांनी भाष्य केले आहे. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिले पाहिजे. कुणालाही रोखण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शहरात प्रत्येक राज्याचे भवन आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशने एखादं कार्यालय काढलं म्हणून घाबरण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पॉवरफूल आहे. मंत्र्यांचा वर्क फ्रॉम जेल सुरू आहे. महाराष्ट्रात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्याचा फटका राज्याला बसत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
शरद पवारांनी बहुमूल्य सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा
शरद पवारांनी(Sharad Pawar) महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले तर चांगले होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, महिला, बारा-बलुतेदारांच्या प्रश्नांकडे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी लक्ष दिले तर ते अधिक बरे होईल.त्यांच्या ‘बहुमूल्य’ सल्ल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नितांत गरज आहे. देशात मोदी सरकार खूप चांगले काम करत आहे. लोकांचा मोदी सरकारवर विश्वास आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.