नागपूर : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे प्रत्यक्ष सामील होते, त्यांना व्यवहाराची पूर्ण माहिती होती, असा युक्तिवाद ‘एमआयडीसी’चे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी मंगळवारी सेवानिवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या एक सदस्यीय चौकशी समितीसमक्ष केला. त्यांनी यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांकडे समितीचे लक्ष वेधले.नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे उकानी यांना संबंधित जमीन विकण्याचा अधिकार होता, असे खडसे यांनी जबाबात म्हटले होते. यानंतर त्यांनी बचावाचा मार्ग बदलवून या व्यवहाराची आपल्याला काहीच माहिती नव्हती, असा पवित्रा घेतला. त्यावरून खडसे सत्य लपवत असल्याचे दिसून येते. खडसे यांनी सौ. खडसे, चौधरी व सचिव काशीद यांची साक्ष समितीसमक्ष घ्यायला पाहिजे होती. तसे न झाल्याने खडसे यांच्यावरील आरोपांना बळकटी मिळते. उकानी यांनी सचिवाची भेट घेतल्यानंतर खडसे यांनी तत्काळ स्वत:च्या बंगल्यावर अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. २८ मार्च २०१६ रोजी सौ. खडसे व त्यांच्या जावयांनी कोलकाता येथे जाऊन जमीन खरेदीचा व्यवहार केला. संबंधित व्यक्तीला ५० लाख रुपये देण्यात आले. १२ एप्रिल रोजी खडसे यांनी पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. २८ एप्रिल २०१६ रोजी जमिनीचे विक्रीपत्र झाले. या व्यवहाराची माहिती ६ जून रोजी मिळाल्याचे खडसे सांगतात. असे आहे तर त्यांनी ४ जून रोजी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला, असा प्रश्न अॅड. जलतारे यांनी उपस्थित केला.संपादित केलेल्या जमिनीवर शासनाचा अधिकार असतो. जमीन मालकाला केवळ नुकसानभरपाई मिळविण्याचा अधिकार असतो. परिणामी उकानी यांनी केलेले विक्रीपत्र अवैध ठरते. खडसे यांनी मंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग करून स्वत:च्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या. हे कृत्य विश्वासघातात मोडते. या सर्व बाबी लक्षात घेता याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे, असे अॅड. जलतारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वकिलाने वेळ मागितलाप्रत्युत्तर सादर करण्यासाठी खडसे यांच्या वकिलाने समितीकडे उद्या, बुधवारपर्यंत वेळ मागून घेतला. एमआयडीसीच्या दाव्यावर खडसेंचे वकील काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़
गैरव्यवहारात खडसे प्रत्यक्ष सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 03:35 IST