विशाल गांगुर्डे / ऑनलाइन लोकमत
शैक्षणिक साहित्य निर्मिती : पिंपळनेर येथील माध्यमिक शिक्षक दिनेश नहिरे यांचे संशोधन
पिंपळनेर, दि. 4 - विद्यार्थ्यांकडून ज्ञानाचे धडे गिरवून घेताना आपणही काही तरी वेगळे केले पाहिजे, या उद्देशाने पिंपळनेर येथील एन. एस. पी. पाटील विद्यालयातील माध्यमिक शिक्षक दिनेश नहिरे यांनी ‘डिजीटल ग्राफ पेपर’ तयार केला आहे. या डिजीटल ग्राफ पेपरमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाबाबत गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
गणित विषयात प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, तसेच ज्ञानरचनावाद, स्वयंअध्ययन व स्वानुभव या सर्व संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये दृढ व्हाव्यात म्हणून डिजीटल ग्राफ पेपर या शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे.
अनेक विद्यार्थ्यांना गणित अभ्यासाची भीती वाटते. त्यामुळे मनोरंजनातून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे, हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी अनोख्या अशा शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे.
प्लायवूडचा केला वापर
डिजीटल आलेख तयार करण्यासाठी दिनेश नहिरे यांनी प्लायवूडचा वापर केला आहे. एका आलेख पेपरवर विशिष्टू बिंदू प्रणाली पेन्सीलीच्या साहाय्याने आखून हा आलेख पेपर प्लायवूडला त्यांनी फिट केला आहे. या प्लायवूडच्या बाजूला इलेक्ट्रीक फिटिंग केली आहे. विशिष्ट बिंदूवर बोट ठेवल्यानंतर इयत्ता नववी व दहावीच्या अभ्यासक्रमातील गणितातील क्लिष्ट संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
सोप्या पद्धतीने घेता येणार गणिताचे शिक्षण
नहिरे यांनी तयार केलेल्या सात प्रकाराच्या आलेखातून विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. त्यात त्रिकोणमितीय गुणोत्तर, त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किंमती, चरणांची ओळख, चरणीय कोन व चरणातील कोन, अक्षाला समांतर रेषा, प्रतलामध्ये बिंदू स्थापन करणे व प्रतलातील बिंदूचे निर्देशक विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेता येणार आहे. दिनेश नहिरे यांनी हे शैक्षणिक साहित्य तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडले होते. त्यानंतर या साहित्याची निवड जिल्हास्तरीय व पुढे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
डिजीटल आलेख ग्राफचे फायदे असे...
- विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागणार.
- गणितातील गोडी निर्माण होणार.
- ग्राफमधील सर्व संकल्पना स्पष्ट होतील.
- त्रिकोणमितीतील सर्व गुणोत्तरे स्पष्ट होतील व विद्यार्थ्यांना लगेचच समजतील.
- कोन व कोनाचे सर्व प्रकार स्पष्ट होतील.
- विद्यार्थ्यांना गणित विषयात प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळणार.
वर्गात गणितातील ग्राफ शिकवत असताना बऱ्याचशा संकल्पना अपूर्ण राहत होत्या. त्यामुळेच डिजीटल आलेख ग्राफ पेपर तयार केला. आपली संकल्पना रूजविण्यासाठी व विद्यार्थी स्वयंअध्ययन कसा करेल? यासाठी हा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण ग्राफ ज्ञानरचनावादावर आधारित आहे. यात एलईडी ब्लबचा वापर केला आहे. यात तीन कलर्स आहेत. हिरवा रंग- एक्स निर्देशक, व धननिर्देशक दर्शवितो. लाल रंग- वाय निर्देशक दर्शवितो व ऋण निर्देशक दर्शवतो; तर निळा रंग हा आरंभ बिंदू दर्शवितो. यातून विद्यार्थ्यांना जलद गतीने आलेख समजतो. विशेषत: विद्यार्थी त्यांच्या कौशल्याचा वापर करून हा आलेख स्वत: हाताळू शकतात.
- दिनेश गोरख नहिरे, माध्यमिक शिक्षक, पिंपळनेर