- दीपक होमकर, पंढरपूर‘पंढरपुरातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस ओलांडून जात असतांनाही चैत्री वारीनिमित्त आलेल्या विठ्ठलभक्तांनी आठ तास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले आणि सूर्यनारायणाच्या दाहच्या तीव्रतेपेक्षा निस्सीम भक्ती अधिक खोल असल्याचे दाखवून दिले. शुक्रवारी ४३़७ तर शनिवारी ४३़२ अंश सेल्सियस असे तापमान वैष्णवांना विठ्ठल दर्शनापासून रोखू शकले नाही़चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरच्या यात्रेला अधिक महत्त्व असते़ त्यामुळे त्या यात्रेला जाता-जाता पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक दिंड्या व कावड्या पंढरपूर मार्गे जातात़ त्यामुळे या चैत्रीवारीला धावती वारी असेही म्हणतात. दुष्काळाचा दाह आणि विक्रमाकडे वाटचाल करणारे तापमान यामुळे यंदाची वारी दरवर्षीपेक्षा निम्मीच होईल, असा अंदाज पंढरपूरकरांचा होता; मात्र विठ्ठलावर जीवापाड भक्ती करणाऱ्या वारकरी भक्तांनी हा अंदाज फोल ठरवला. या धावत्या वारीच्या निमित्तानेही पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले. पहाटेपासूनच अनेक दिंड्या आणि कावडी पंढरपुरात दाखल व्हायला सुरुवात झाली. सकाळी नऊनंतर उन्हाची तीव्रता कमालीची वाढत असल्याने नऊच्या आत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी पहाटेपासूनच चंद्रभागेत पवित्र स्नान करून दर्शनबारीत उभे राहिले़ त्यामुळे पहाटे दर्शन सुरु होण्याआधीच दर्शनबारी वीणेगल्लीपर्यंत पोहोचली होती तर सकाळी नऊ वाजता ती सारडा भवनच्या पुढे होती. नऊनंतर मात्र दर्शनबारी वाढली नाही, ती ओसरत वीणेगल्लीपर्यंत आली़ त्यानंतर सायंकाळी ऊन उतरल्यावर पुन्हा गर्दी वाढली आणि दर्शनबारी पुन्हा वाढली आणि ती रांग पत्राशेडच्या जवळपास पोहोचली होती. त्यामुळे दर्शनासाठी सुमारे सात ते आठ तासांचा वेळ लागत होता़ (प्रतिनिधी)व्हीआयपी दर्शन; कडेकोट बंदव्हीआयपी आणि आॅनलाईन दर्शन पास दशमी, एकादशी व द्वादशी या तीन दिवसांत बंद ठेवण्यात आले होते. शिवाय बारीत होणारी घुसखोरीही कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे जवळपास बंद होती़ त्यामुळे भाविकांना सात ते आठ तासांत दर्शन होणे सुकर झाले अन्यथा व्हीआयपी पास सुरु असल्यास दर्शनाला दहा तासांहून अधिक वेळ लागतो.राज्यात सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे यंदाची वारी दरवर्षीपेक्षा निम्मीच होईल, असा अंदाज पंढरपूरकरांचा होता; मात्र विठ्ठलावर जीवापाड भक्ती करणाऱ्या वारकरी भक्तांनी हा अंदाज फोल ठरवला.
भक्तांपुढे सूर्याचा दाहही फिका!
By admin | Updated: April 17, 2016 01:46 IST