काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात. देवेंद्र फडणवीस हे लाडकी बहिणीला २१०० रुपये देणार होते, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार होते, पण यातील त्यांनी काहीच केले नाही, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.
धुळे येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही, सभ्यता, परंपरा व संसस्कृतीला फाशी देण्याचे काम केले आहे म्हणून मी त्यांना जल्लाद म्हटले आणि दिलेला शब्द त्यांना आठवत नाही म्हणून गजनी म्हटले. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग करायला लावू म्हणाले होते पण या सर्वांचा त्यांना विसर पडला. लाडकी बहिणीला २१०० रुपये देणार होते, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार होते पण यातील त्यांनी काहीच केले नाही. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात, असेही सपकाळ म्हणाले.
काँग्रेस पक्ष सर्वांना साथ देणारा पक्ष आहे, विविधतेत एकता अबाधित ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे तर दुसरीकडे भाजपाचे राजकारण मात्र तोडफोडीचे, जाती धर्मात भांडणे लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले, नगरपालिका निवडणुकीतही चांगले यश मिळाले, धुळ्यातून शोभाताई बच्छाव यांना लोकसभेत पाठवले आता धुळे महानगरपालिकेत काँग्रेसची एक हाती सत्ता द्या, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देश एक झाला, लाखो लोकांनी त्याग केला, बलिदान दिले त्यांचा वारसा काँग्रेसला आहे तर स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना भाजपांचे पूर्वज मात्र ब्रिटिशांबरोबर होते. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग नव्हता. जिन्ना यांच्या मुस्लीम लिगसोबत जनसंघाने युती करत उपमुख्यमंत्रीपद भोगले आहे. हा देश सर्वांचा आहे, कोणा एका वर्ग विशेषाचा नाही, ज्यांचे देशाच्या स्वातंत्र्यात काहीही योगदान नाही ते आज सत्तेत आहेत असे सपकाळ म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत धुळ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये सलग तीन वेळा निवडून आलेले समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी, परवेझ शेख, अजहर पठाण, एमआयएमचे गनी डॉलर, जुनेद पठाण, शिवसेनेचे प्रेम सोनार, भाजपाचे मुर्तुजा अन्सारी यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी खा. डॉ. शोभाताई बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भाई नगराळे, राजाराम पानगव्हाणे, धुळे काँग्रेसचे अध्यक्ष साबीर शेख, जावेद फारुखी, धुळे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रविणबापू चौरे, डॉ. दरबारसिंग गिरासे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Summary : Harshvardhan Sapkal criticized Devendra Fadnavis, accusing him of making false promises regarding farmers' loan waivers and assistance to women. He alleged Fadnavis betrayed democratic values and broke promises, unlike Congress, which promotes unity.
Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने देवेंद्र फडणवीस पर किसानों की ऋण माफी और महिलाओं को सहायता के बारे में झूठे वादे करने का आरोप लगाया। उन्होंने आरोप लगाया कि फडणवीस ने लोकतांत्रिक मूल्यों को धोखा दिया और वादे तोड़े, जबकि कांग्रेस एकता को बढ़ावा देती है।