Jyotiraditya Scindia, Devendra Fadnavis oath taking ceremony : महाराष्ट्रात महायुतीने बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकली. या नव्या सरकारचा आज शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या तिघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जंगी सोहळा पार पडला. त्यावेळी उपस्थित देशाचे केंद्रीय मंत्री ज्योदिरादित्य शिंदे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या.
"आज महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा आले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या त्रिमूर्तीच्या नेतृत्वात महाराष्ट्राची प्रगती आणि विकास सुनिश्चित आहे. ही त्रिमूर्ती पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विधायक कामे करेल. निवडणुकीच्या आधी देखील आम्ही हाच संकल्प केला होता. पुढल्या पाच वर्षात आम्ही तो संकल्प साकार करू आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर उत्तम काम करू," असा विश्वास ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या शपथविधीला महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. पण त्यांना काही वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. पण त्यांनी ट्विटच्या माध्यमातून नव्या सरकारचे अभिनंदन केले. राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, "आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो."