मुंबई - सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष् बळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही केवळ सहकार्याची सुरुवात आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (MFSCDC), मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, एफटीआयआयचे चे अध्यक्ष आणि अभिनेते आर.माधवन, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, एफटीआयआयचे कुलकुरू धीरज सिंग, पीआयबीच्या महासंचालक श्रीमती स्मिता वत्स शर्मा, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मकदूम, एफटीआयआयचे प्राध्यापक संदीप शहारे, उप सचिव महेश वाव्हल, नंदा राऊत, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय प्रशांत साजणीकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, आज सामान्य माणूसही एक क्रिएटर झालेला आहे. त्याच्या सर्जनशीलतेच्या जोरावर एक स्वतंत्र स्पेस त्याने निर्माण केली असून, ही क्रिएटिव्ह स्पेस आता मोनेटाईज होऊ लागली आहे. त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमी ही आजची गरज बनली आहे. फडणवीस यांनी यावेळी 92,000 कोटी रुपयांपासून 100 दिवसांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलेल्या क्रिएटर्स इकॉनॉमीच्या झपाट्याचा उल्लेख करत सांगितले की, या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मानव संसाधनाची नितांत आवश्यकता आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन ही दोन्ही गोष्टी या नव्या युगात अत्यंत आवश्यक आहेत. अनेकांकडे कौशल्य असूनही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना व्यावसायिक संधी मिळत नाहीत. या करारामुळे ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन या दोन्ही गोष्टी मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी एफटीआयआय आणि महाराष्ट्र शासनाच्या कोलॅब्रेशनचं स्वागत करताना सांगितलं की, एफटीआयआय ही संस्था देशाला आणि जगाला दर्जेदार कलाकार देणारी आहे, तर महाराष्ट्राची फिल्मसिटी ही व्यावसायिक सिनेमाचा आधार आहे. या दोन मजबूत इकोसिस्टीम्स एकत्र आल्यामुळे तिसरी, अधिक क्रिएटिव्ह आणि सशक्त इकोसिस्टीम तयार होईल, याबद्दल शंका नाही.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड शेलार म्हणाले की, एफटीआयआयची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावरील आहे. आजच्या या सामंजस्य करारामुळे आता महाराष्ट्रातील गावखेड्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पातळीवरच प्रवेश घेता येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील गावखेड्यातील, तालुक्यातील मुलांनी आता चित्रनगरीकडे करिअर घडविण्याच्या उद्देशाने पाहावे. महाराष्ट्रात गोरेगाव, कोल्हापूर, प्रभादेवी आणि कर्जत या चार ठिकाणी केंद्र आहे. या करारामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी मिळतील, महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेल्या लोकेशन्सचा प्रचार होणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी सांगितले.
एफटीआयआयचे अध्यक्ष आर.माधवन म्हणाले की, लहान शहरांमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिभावान व्यक्ती पुढे येत आहेत. एक स्त्री लोणचे कसे बनवावे हे शिकवत आहे आणि ती तिचे व्हिडीओ एका छोट्या झोपडीतून बनवते, त्यावरून उत्पन्न कमावते. महाराष्ट्रातील ही प्रतिभा इतिहास घडविणारी आहे. पश्चिमी देशांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच सुपरमॅन, बॅटमॅन आणि स्पायडरमॅन यांच्या पॉवर असल्याचे दाखविले जाते. पण आता वेळ आली आहे की जग हनुमान आणि कृष्णाचंही महात्म्य ओळखावे. आपल्या गावां-शहरांमधून आलेल्या या लोकांकडे सांगण्यासारख्या अद्वितीय कथा आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून आपण "सुपर पॉवर" आणि "सॉफ्ट पॉवर" या दोन्ही गोष्टी साध्य करू शकणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.