NCP Deputy CM Ajit Pawar News: पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना, मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही. लोकांची कामे केली तर लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीकडून नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांकडे काहीही मुद्दे राहिले नसल्याने ईव्हीएमनंतर आता मतदारयाद्यांचा विषय उकरून काढण्यात आला आहे. विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा आयोगाचा काहीही दोष नसतो, पण पराभव झाल्यानंतर तो पचविता येत नसल्याने असे आरोप होत आहेत, या शब्दांत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.
निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट करावी
देशात काही मोजक्या संस्था आहेत ज्यांना संविधानाने स्वायत्तता देण्यात आली आहे. निवडणूक आयोग त्यापैकीच एक आहे. आयोगावर होत असलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात आमच्या उमेदवाराला ४८ हजार मते कमी पडली. पण, पाच महिन्यांनंतर विधानसभा निवडणूकीत त्याच मतदारांनी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने मला निवडून दिले. म्हणजे मी तिकडे काही गडबड केली असा अर्थ होतो का? लोकसभा निवडणुकीला वर्ष उलटले, विधानसभा निवडणूक होऊन नऊ महिने झाले, विरोधकांनी दिलदारपणे पराभव स्वीकारला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी विरोधकांना दिला.
आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही
एका पत्त्यावर अनेक मतदार राहात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ही बाब आयोगाने पडताळून, पाहायला वी. तसे नसेल तर ते स्पष्ट केले पाहिजे, पण चूक असेल तर तसेही आयोगाने स्पष्ट केले पाहिजे. आयोगाच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ज्यांचा अधिकार आहे त्यांनी उत्तर द्यायला हवे. लोकशाहीत विविध पक्ष आपले मत मांडू शकतात म्हणजे आम्ही आयोगाची बाजू घेतो असे नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, निवडणुर्कीपूर्वी तीन-चार ईव्हीएममध्ये फेरफार करून मते वाढवून देण्याचा दावा काही लोक करत होते. पण ते सर्व फसवणुकीचे प्रकार होते. काही त्याला बळी पडतात. जनतेच्या मनात कुणाला सत्तेवर बसवायचे, कुणाला हटवायचे हे ठरलेले असते, तसे ती करते. अनेक वर्षे देशात-राज्यात काँग्रेसचे सरकार होते, जनतेने ते बदलले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना अभूतपूर्व यश मिळाले, तेव्हा आयोग ठीक काम करत होता. आता त्यांचा दारुण पराभव झाला, तेव्हा आयोगाबद्दल आरोप केले जात आहेत, याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले.