Deputy CM Ajit Pawar News: कोणी काय म्हणावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ही लोकशाही आहे. संविधानावर चर्चेनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही अभिनंदन केले. इतक सुंदर भाषण मुख्यमंत्र्यांनी केले. अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केले. विरोधकांकडे कोणताच मुद्दा आता राहिलेला नाही, त्यामुळे ते वेगळे काही तरी मुद्दे काढत आहेत. विरोधक नुसते विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून दहा-पंधरा मिनिटे घोषणा द्यायचे आणि सभागृहात येऊन बसायचे. मीडियाच्या माध्यमातून जनतेला आम्ही फार काही काम करत असल्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. सभागृहात विरोधकांची उपस्थिती जास्त नव्हती, फार कमी लोक उपस्थिती राहायचे. आमच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना खरपूस शब्दांत प्रत्युत्तर दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, संतोष देशमुख प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही. उज्ज्वल निकम यांच्यासारखे प्रख्यात वकील तिथे नेमले गेले आहेत. इथे कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. जो चुकीचा वागला असेल, जो दोषी असेल, जो मास्टरमाइंड असेल त्याला तेथे शासन होणारच, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच सौगात-ए-मोदी यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, चांगला काही कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटून घ्यायचे काय? सर्वधर्म समभाव आपल्या देशाची परंपरा आहे. ज्या पद्धतीने इतर सण असतात त्या पद्धतीने रमजान महिना महत्त्वाचा असतो. त्यानिमित्त काही घटकाला शुभेच्छा देण्याकरिता हा कार्यक्रम आणला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा होते, रयतेचे राजा होते, हे जगाने मान्य केलेय
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, असे शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले होते. यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते. राजा कसा असावा हे जगाने मान्य केले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही राज्याची आर्थिक स्थिती विस्कटणार नाही. राज्याच हित साधेल असा विचारपूर्वक अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही अर्थसंकल्पातून केला. निवडणुकीपूर्वी आम्ही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातील लाडकी बहीण आणि वीज कर्जमाफीची योजना चालू ठेवली आहे. आमची आर्थिक परिस्थिती बघत सर्व योजना करणार आहोत. आम्ही दिलेल्या शब्दापासून बाजूला गेलो नाही. पाच वर्षांसाठी जी आश्वासन दिली, ती पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू, अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली.