...म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना?; देवेंद्र फडणवीसांचा NCP ला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 08:36 AM2023-02-24T08:36:49+5:302023-02-24T08:37:35+5:30

लोणी येथे महसूल परिषदेला आले असता फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis strongly criticized Sharad Pawar and NCP | ...म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना?; देवेंद्र फडणवीसांचा NCP ला खोचक टोला

...म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना?; देवेंद्र फडणवीसांचा NCP ला खोचक टोला

googlenewsNext

लोणी (जि. अहमदनगर)  - सर्वच पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले आहेत. आता यंदाच्या पोटनिवडणुकीत स्वत: शरद पवार गेले आहेत. यापूर्वीच्या कोणत्याही पोटनिवडणुकीत ते गेले नाही. त्यांना काही ना काही वाटत असेल म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना? व तशीही निवडणुकीत मतदारांना भेटताना लाज कशाची? असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीत प्रचाराला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत आहेत, या विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी हे उत्तर दिले.

लोणी येथे महसूल परिषदेला आले असता फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेतील फूट फडणवीसांनी केली, या आरोपांसंदर्भात विचारले असता आपले कोणाशीही शत्रुत्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, पहाटेच्या शपथविधीबाबत हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहे. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धे सत्य बाहेर आले आहे. पूर्ण सत्यसुद्धा बाहेर येईल. 

उद्धव ठाकरे राजकीय विरोधक, शत्रू नाहीत 

राज्यातील राजकीय संस्कृतीत शत्रुत्वाला स्थान नाही. मात्र अलीकडच्या काळात शत्रुत्वाची भावना पाहायला मिळते आहे. मात्र, ती आपल्याला संपवावी लागेल. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. 

शेतकऱ्यांना चार हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेतून पुरविणार
राज्यातील शेतकऱ्यांना आठ हजार मेगावॅट वीज पुरवठा केला जातो. यातील चार हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेतून पुरविण्याचा प्रयत्न आहे. त्याकरिता शेतकऱ्यांकडील जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांपर्यंत मोबदला दिला जाणार आहे. या जमिनीवर सौरऊर्जेचे फिडर्स बसवून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज दिली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. 

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis strongly criticized Sharad Pawar and NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.