मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान तैनात करण्याचे आश्वासन देऊनही राज्य सरकारने अद्याप शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये पोलीस नियुक्त केलेले नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने दोन दिवसांत शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत पोलीस नियुक्त करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. अन्यथा याबद्दल विचार करण्यात येईल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले.गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने सात दिवसांत मुंबईतील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत ५६ पोलीस गस्त घालण्यासाठी नियुक्त करण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. मात्र प्रत्यक्षात पोलिसांची नियुक्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने दोन दिवसांत शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत पोलीस नियुक्त करण्याचे निर्देश दिले. मात्र सरकारी वकिलांनी पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने दोन दिवसांत रुग्णालयांत पोलीस नेमणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले.‘पोलीस नेमण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे? याची चौकशी करतो,’ असे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. केवळ मुंबई नाही तर उर्वरित महाराष्ट्रातही डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अन्य भागांतही शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत पोलीस नियुक्ती करण्याबाबत काय व्यवस्था करण्यात आली आहे ते सांगा, असे म्हणत खंडपीठाने सरकारी वकिलांना २२ जुलैपर्यंत सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करा
By admin | Updated: July 21, 2016 05:25 IST