मुंबई : डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी सुरू असलेली कीटकनाशकं निकृष्ट दर्जाची असून, अन्य शहरांनी काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीलाच हे कंत्राट देण्यात आले असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ या औषधांचा डासांवर परिणाम होत नसल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला़ त्यामुळे याप्रकरणी आयुक्त सीताराम कुंटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे़डेंग्यूचे डास वाढण्याचे खापर मुंबईकरांवर फोडणाऱ्या पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे उघड झाले आहे़ मुंबईकरांच्या आरोग्याशी प्रशासनाचा एकप्रकारे खेळ सुरू असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी आज पत्रकार परिषदेतून केला़ डेंग्यू डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी पालिकेने मेसर्स युनिव्हर्सल आॅर्गॅनिक्स, मेसर्स नीता पॉल इंडस्ट्री या कंपन्यांना २७ कोटींचे कंत्राट दिले़ परंतु निकृष्ट कीटकनाशकं पुरवठाप्रकरणी सुरत व पुणे शहरांनी या कंपनीला काळ्या यादीत टाकलेले आहे़ तसेच महाराष्ट्र राज्यात औषध विकण्याचा परवाना या कंपनीला देण्यात आलेला नाही़ तर मध्य प्रदेश सरकारने या कंपनीच्या औषधांवर ठपका ठेवला असल्याचे कोटक यांनी सांगितले़ कंपनीकडून ६८ लाखांचा दंड वसूलपायरेथ्रम एक्स्ट्रॅक्ट हे कीटकनाशक निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आल्यानंतर पालिकेने संबंधित कंपनीला ६८ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता़ त्यानंतरही या कंपनीला कंत्राट देण्यामागे कोणाचे हितसंबंध लपलेले आहेत, याची चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे़भाजपाच्या आक्रमकतेने शिवसेना अडचणीतकेंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजपाचा पालिकेतील आवाज चांगलाच वाढला आहे़ महापालिकेत युती अद्याप कायम असूनही भाजपाच विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे़ गेल्या वर्षी स्थायी समितीमध्ये कीटकनाशकांच्या औषधपुरवठ्याचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते़ मात्र आता भाजपानेच अशाप्रकारे कोंडीत पकडण्यास सुरुवात केल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे़ (प्रतिनिधी)
कीटकनाशक घोटाळ्याने मुंबईत डेंग्यूचा फैलाव
By admin | Updated: November 8, 2014 04:10 IST