एडिस डासांच्या अळ्या मरतच नाही : नागरिकांच्या जीवाशी खेळसुमेध वाघमारे - नागपूरशहरात डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत २५८ जणांना हा रोग झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वात जास्त लहान मुले आहेत. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने डासरोधक ‘अबेट’ या कीटकनाशकाची फवारणी केली जात आहे. परंतु या कीटकनाशकामुळे डेंग्यू डासांच्या अळ्या मरतच नसल्याची धक्कादायक माहिती आहे. अशा कीटकनाशकाची फवारणी करून मनपा नागरिकांच्या जीवाशी खेळ तर खेळत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.डेंग्यूच्या रोगाने लोकांना हादरवून सोडले आहे. या रोगाला एडिस इजिप्ती जातीचा डास कारणीभूत आहे. हा डास आपले प्रजनन स्वच्छ पाण्यात करतो. यासाठी टाक्या, कूलर, फुलदाणी, कुंड्या, टायर्समध्ये साचलेल्या पाण्याची मदत घेतो. यावर उपाय म्हणून मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी घराघरांना भेटी देत या साहित्याची तपासणी करीत आहे. या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत ३ लाख ७० हजार ४५७ घरांची तपासणी करण्यात आली. त्यातील ११ हजार ४८५ घरांत डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. हे कर्मचारी घरमालकांकडून पाण्याची विल्हेवाट लावतात. जिथे पाणी फेकणे शक्य नाही त्या पाण्यात डासनाशक अबेट औषध टाकतात. परंतु या औषधामुळे डासांच्या अळ्याच मरत नसल्याचे खुद्द कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही फवारणी निव्वळ धूळफेक ठरत आहे. यामुळे उघड्या पाण्याचा साठा, डबके डेंग्यूच्या उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. मलेरिया, डेंग्यू व मेंदूज्वर पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी अबेट नावाची कीटकनाशक फवारणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. एक लिटर पाण्यात २० एमएल अबेट टाकून ते डासांच्या अळ्या असलेल्या पाण्यात टाकले जाते. परंतु या औषधाने डेंग्यू डासांच्या स्टेज तीन आणि चारमधील अळ्या मरत नसल्याचे आढळून आले. विशेषत: डास तयार होण्यापूर्वी ‘प्युपा’नावाच्या स्टेजमध्ये याचा प्रभावच दिसून येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘अबेट’ची किंमत प्रति लिटर १२०० रुपये आहे. शहराला महिन्याकाठी हे औषध ३० लिटरपेक्षा जास्त लागते. मात्र या औषधाचा प्रभावच पडत नसल्याने यावर होणाऱ्या खर्चावर पाणी फेरले जात आहे.(प्रतिनिधी)
डेंग्यूवरील फवारणी कुचकामी
By admin | Updated: November 4, 2014 01:00 IST