बारामती : वाढत्या डेंगी रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात सर्वेक्षण करण्यात आले. शहरात काही ठिकाणी डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या सापडल्या. निष्काळजीपणा दाखविणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी ही माहिती दिली.शहरातील सूर्यनगरी, मोतानगर, तांबे इस्टेट आदी भागात डेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य निरीक्षक नारखेडे यांच्यासह दहा जणांच्या पथकाने सोमवारी शहरात विविध ठिकाणी पाहणी केली. या वेळी शहरातील नागरिकांनी साठविलेल्या पाण्यात डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या अळ्या सापडल्या. अनेक ठिकाणी पाण्याच्या डबक्यात अळ्या सापडल्या. या वेळी कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसरातील उघड्यावर पडलेले टायर, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली. त्यामध्ये साठलेले पाणी काढून टाकण्यात आले. नारखेडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की शहरात दर गुरुवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. परिसरात अस्वच्छता होऊ नये, यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. पाणी साठून डेंगी आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या अळ्या आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी केलेल्या पाहणीत भोई तालीम परिसर आणि इतर भागांत डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठविण्याची नागरिकांची मानसिकता दिसून येते. हे पाणी सात दिवसांच्या आत बदलणे गरजेचे आहे. शहरातील हनुमाननगर येथे पावसाच्या साठलेल्या पाण्यात आॅईल टाकण्यात आले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती नष्ट होण्यास मदत होणार आहे. डेंगीपेक्षा तापाचे रुग्ण अधिक आहेत. शहरातील काही भागांत अर्धवट स्थिती असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी डेंगीच्या अळ्यांची पैदास होत असल्याचे नगरपालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधितांना प्रशासन तातडीने नोटीस काढत आहे. काही इमारतींच्या टेरेसवरील भागात अनावश्यक वस्तूंमध्ये पाणी साठते. या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या अळ्या वाढण्याचा धोका असतो. या ठिकाणी स्वच्छता आवश्यक आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने धूर फवारणी आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मात्र, डेंगीपासून दूर राहण्यासाठी नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे. (वार्ताहर)>मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्यासह सूर्यनगरी परिसरातील मोतानगर येथे पाहणी करण्यात आली. या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठल्याचे दिसून आले. संबंधित व्यावसायिकाला पाणी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी दिली.
बारामतीत आढळल्या डेंगीच्या अळ्या
By admin | Updated: September 21, 2016 01:46 IST