मुंबई : आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना महावितरणमार्फत ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने’अंतर्गत (सौभाग्य) ३१ डिसेंबर २०१८पर्यंत वीज देऊन राज्यात शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना सौभाग्य योजनेत वीजजोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार आहे. इतर लाभार्थ्यांना पाचशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे पाचशे रुपये संबंधित लाभार्थ्याने त्याच्या बिलातून दहा टप्प्यांत भरावयाचे आहेत. थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेली घरे, तात्पुरत्या शिबिरामधील स्थलांतरित होऊ शकणारी घरे, तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत.योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे.अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येणार आहे.पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुद्धा मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.१राज्यात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ११ लाख ६४ हजार १३५ लाभार्थ्यांना सौभाग्य योजनेंतर्गत वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने तर २१ हजार ५६ लाभार्थ्यांना अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे.२दारिद्र्यरेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दीनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.
डिसेंबर २०१८पर्यंत राज्यातील प्रत्येक घरात वीज, महावितरणचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:30 IST