नागपूर : पराभूत मल्लाला प्रेक्षकांनी डिवचल्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले. या हाणामारीत काही मल्लांसह त्यांचे समर्थक किरकोळ जखमी झाले. दंगलखोर प्रेक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिटणीस पार्कवर शनिवारी सायंकाळी पुणे शहरचा महेश मोहोळ आणि पुणे जिल्ह्याचा राहुल खणेकर या मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरी गादी गटातील चुरशीची लढत झाली. ही कुस्ती पाहण्यासाठी पुण्याहून ५०-६० जण आले होते. लढतीत पराभूत झालेला राहुल आपल्या स्थानावर परत जात असताना काही प्रेक्षकांनी त्याला डिवचले. यामुळे त्याचे पाठीराखे चिडले. दोन्ही गटांत बाचाबाची झाली आणि एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. एका प्रेक्षकाने डोक्यात टणक वस्तू मारल्याने राहुल रक्तबंबाळ झाला. सुरक्षेसाठी तेथे केवळ दोन पोलीस हजर होते. माईकवरून वारंवार आवाहन केल्यानंतर हे पोलीस जागचे हलले. डिवचणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी चोपही दिला.खिसे झाले साफ...भांडण सोडविण्यासाठी आलेले माजी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांनाही मारहाणीचा फटका बसला. त्यांच्या खिशातील महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली; तर गोंधळाचा लाभ घेत चोरट्यांनी काही जणांच्या खिशांवर हात साफ केला.
‘महाराष्ट्र केसरी’च्या फडात वाद
By admin | Updated: January 10, 2016 04:05 IST