तळोजा : दुकानात मिठाई घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने कानशिलात मारल्याने एका तरुणाचा तळोजात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार रात्री तळोजा देवीचापाडा या ठिकाणी रिद्धिसिद्धी स्वीट मार्ट येथे काम करणारा काळुराम रायका (३५) हा कार्यरत होता. या वेळी ग्राहकाने मिठाई घेतल्यानंतर प्लास्टीक पिशवीची मागणी केली. मात्र प्लास्टीक पिशव्या बंद केल्याने त्या देऊ शकत नाही, असे काळुराम यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकाने रागाच्या भरात कानशिलात लगावल्याने काळुराम बेशुद्ध होऊन कोसळला. त्याला पनवेलमधील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डोक्याची नस फुटल्याने निदर्शनास आले व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत म्हणाले. (वार्ताहर)
कानशिलात मारल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 03:23 IST