Ajit Pawar On IND vs PAK Match: आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्याची तयारी सुरू केली आहे. आशिया कप स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सर्व सामने यूएईमध्ये खेळले जातील. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर देशातील राजकारणाऱ्यांसह अनेक लोक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला विरोध करत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा विषयांना दोन बाजू असतात असं म्हटलं आहे.
आशिया कप स्पर्धा सुरू होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत, ज्यांना गट अ आणि गट ब मध्ये विभागण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत आणि पाकिस्तान सारख्या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. त्यामुळे या सामन्यावरुन सुरु असलेल्या विरोधावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलताना प्रतिक्रिया दिली.
"आता यावर दोन मते असू शकतात. पाकिस्तान हा आपला शत्रू राष्ट्र आहे. ते आपल्याशी संवाद साधत राहतात. ते वेगवेगळ्या मार्गांनी दहशतवादी कारवाया करत राहतात. कधीकधी ते खेळाच्या माध्यमातून काही वाद निर्माण करतात. या प्रकरणात, दोन्ही प्रकारचे अर्थ लावता येतात. असा एक गट आहे जो या गोष्टी खेळांशी जोडू नयेत असे मानतो. तर असा एक गट आहे जो असे मानतो की आपले पाकिस्तानशी कोणतेही संबंध नसावेत, ना व्यापारात ना खेळात. पण दुसरीकडे, असाही एक गट आहे जो खेळावर प्रेम करतो. जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो तेव्हा प्रत्येकजण तो पाहण्यासाठी सर्वकाही बाजूला ठेवतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा असे विषय उद्भवतात तेव्हा त्यांच्या दोन बाजू असतात," असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या सामन्याला कडाडून विरोध केला आहे. बीसीसीआयने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी भारतीय संघ पाठवण्याच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहित दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर बीसीसीआयच्या भूमिकेवर आणि राष्ट्रीय हितांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
"आपल्या देशाला आणि नागरिकांना पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना सतत तोंड द्यावे लागले आहे. अलिकडेच, माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. असे असूनही, दुर्दैवाने बीसीसीआय आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की बीसीसीआय राष्ट्रीय हित आणि आपल्या सैनिकांच्या बलिदानापेक्षा वर आहे का?" असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.