अकोला: बियाण्यांचा तुटवडा असल्याचे भासवून निकृष्ट व बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारण्याचा सपाटा कृषी सेवा केंद्र मालकांनी लावला आहे. नामवंत कंपन्यांचे व शेतकर्यांना हवे असलेले बियाणे न देता निकृष्ट कंपन्यांचे बियाणे घेण्याची सक्ती शेतकर्यांना केली जात आहे. पावसाने दडी मारल्याने देशाचा पोशिंदा अगोदरच हवालदिल झालेला असताना, निकृष्ट बियाणे जास्त भावात विकून शेतकर्याची लूट केली जात आहे. जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. शेतकरी अजूनही बियाणे व खतांच्या खरेदीतच व्यस्त आहेत. दरवर्षी जिल्हय़ात लाखो हेक्टरवर कपाशीची पेरणी केली जाते. गतवर्षी ज्या बियाण्यांमुळे चांगले उत्पादन मिळाले, तेच बियाणे खरेदी करण्याकडे शेतकर्यांचा कल असतो; मात्र बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गेल्यानंतर शेतकर्यांसमोर भलत्याच अटी ठेवल्या जात आहेत.शेतकर्यांनी मागितलेल्या कंपनीचे त्याला हवे तेवढे बियोणे देण्यास स्पष्ट नकार देत आहेत. कोणत्याही शेतकर्यास त्याने मागितलेल्या कंपनीच्या बियाण्यासोबत, दुकान मालक म्हणेल त्या कंपनीचे बियाणे घ्यावे लागत आहे. शेतकर्याने नकार दिला, तर त्याला हवे असलेल्या कंपनीचे बियाणेही दिले जात नाही. शेतकर्यांकडून यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्यानंतर, लोकमत चमूने शेतकरी ग्राहक बनून या प्रकाराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान लोकमत चमूलाही तोच अनुभव आला. अनेक कृषी केंद्रांमध्ये अशी सक्ती केली जात असल्याने, शेतकर्यांना हतबल होऊन अन्य कंपन्यांचे निकृष्ट बियाणे विकत घ्यावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे या निकृष्ट बियाण्याची किंमतही, शेतकर्याने मागितलेल्या नामांकित कंपनीच्या बियाण्याएवढीच लावली जाते, हे विशेष.
शेतकर्यांच्या माथी निकृष्ट बियाणे!
By admin | Updated: July 4, 2014 00:44 IST