लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना शुक्रवारी एका व्यक्तीकडून बारा हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटने रंगेहाथ अटक केली. मात्र, ही कारवाई करताना झालेल्या गोंधळाचा फायदा घेत, गावडे यांचा सहकारी साथीदार पोलीस नाईक वैभव हाके हा लाचेच्या रकमेसह फरार झाला आहे.महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एक आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला जामीन मिळवून देण्यासाठी स.पो.निरीक्षक कुंदन गावडे यांनी नातेवाईकाकडे बारा हजारांची लाच मागितली होती. नातेवाईकाने गुरुवारी या प्रकरणी अलिबाग येथे जाऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी महाड शहर पोलीस ठाण्याबाहेरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विवेक जोशी आणि पोलीस निरीक्षक यास्मिन इनामदार यांनी सापळा रचला व १२ हजारांची लाच घेतना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी गावडे यांची या पथकाच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात गावडे यांनी पळ काढला. परंतु त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान गावडे यांचा सहकारी पोलीस नाईक वैभव विठ्ठल हाके याने त्यांच्या टेबलावरील लाचेची बारा हजारांची रक्कम घेऊन पळ काढला.
महाडमधील लाचखोर पोलिसाला अटक
By admin | Updated: May 6, 2017 04:02 IST