मुंबई – अचलपूरचे आमदार आणि अकोल्याच्या पालकमंत्री बच्चू कडू यांना शनिवारी कोरोनाची लागण झाली. राज्यमंत्री बच्चू कडू यांना शनिवारी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पत्नी नयना कडू आणि कुटुंबातील इतर १२ जणांना लागण झाली आहे. स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात त्यांनी कुटुंबीयांसह चाचणी करून घेतली.
बच्चू कडू हे जनसामान्यात मिसळणारा नेता म्हणून ओळखले जातात. लोकांमध्ये थेट संपर्कात राहिल्याने बच्चू कडू यांच्याबद्दल आपुलकीचं वातावरण आहे. बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात व्हिडीओत एक मुलगा बच्चू कडू लवकर बरे व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. या व्हिडीओत हा मुलगा म्हणतो की, देवा बच्चू कडू भाऊलेबरोबर निगेटिव्ह आणू दे, त्यांना काहीच नको होऊ दे असं तो म्हणतोय.
मंत्री बच्चू कडू यांनी स्वत:हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, बेटा मला काहीच नाही होणार, औषधासोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खुप मोठा हो सेवा कर अशा शब्दात बच्चू कडूंनी त्या चिमुरड्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. रविवारी सकाळी अकोला येथे कोविड रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले. तर कुटुंबातील इतर १२ जण अमरावतीच्या बख्तार रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
धनादेश वितरण कार्यक्रमाला उपस्थिती
कडू शनिवारी दिवसभर अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांच्या हस्ते महावितरण कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे धनादेश वाटण्यात आले. यावेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित असल्याने एकच खळबळ माजली आहे.
या लोकप्रतिनिधींनाही झाला होता कोरोना
खासदार नवनीत राणा, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, वरूड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार, शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनादेखील यापूर्वी कोरोना संक्रमण झाले आहे.