मुंबई - शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वाद उद्भवला आहे. मी मांस खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते, हे सुळे यांचे विधान म्हणजे वारकरी संप्रदायाची थट्टा असल्याचा आरोप भाजपने केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विधानावर आपण काहीही बोलणार नाही. याचे उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुळेंच्या विधानाबाबत बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे या मांस खाऊन मंदिरात गेल्याचा वाद वर्षभरापूर्वी उद्भवला होता. वर्षभरापूर्वीच्या त्यांच्या या विधानावरील टीका व्हायरल होत होती. व्हायरल झालेल्या या पोस्टचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी शनिवारी नाशिक दौऱ्यात केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
मांस खाण्याबाबत मी म्हटले होते की, मी ‘रामकृष्ण हरी’वाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मांस खाते. मी त्यांच्यासारखी खोटे बोलत नाही. मी खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई, वडील, सासू सासरे, नवरा मांस खातात. आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंधे नाहीत, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले. या विधानावर भाजपकडून तीव्र टीका करण्यात आली. सोयीच्या विठ्ठलभक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.