जमीर काझी,
मुंबई- कैद्यांतील 'गँगवॉर'मुळे चर्चेत आलेल्या ऑर्थर रोड कारागृहातील वादग्रस्त लाचखोर उपअधीक्षक पी. ए. पाथ्रीकर यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. कनिष्ठ सहकार्याकडून पदोन्नती देण्यासाठी तब्बल ४0 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) सबळ पुरावे असतानाही कायद्यातील तरतुदीच्या आधारावर 'मॅट'ने दिलेल्या आदेशानुसार त्यांना हजर करून घेणे, गृहखात्याला भाग पडले आहे. दोन वर्षांपूर्वी निलंबित झालेल्या पाथ्रीकर यांच्या फेरनियुक्तीमुळे राज्यभरातील कारागृह अधिकारी व कर्मचारी वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गृहविभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी मात्र, त्यांना पुन्हा हजर करून पुण्यातील कारागृह महाविद्यालयात घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. ऑर्थर रोड कारागृहातील एका वर्ग-२ कारागृह अधिकार्याने खातेनिहाय पदोन्नतीसाठी परीक्षा दिली होती, परंतु तत्कालीन कारागृह अधीक्षक वासुदेव बुरकुले व उपअधीक्षक पाथ्रीकर यांनी त्याला पेपर चांगला सोडविलेला नाही, त्यामुळे पदोन्नती हवी असल्यास ४0 लाख द्यावेत, असे सांगितले. कारागृह अधिकार्याला पेपर उत्कृष्ट सोडविल्याची खात्री होती. त्याने 'एसीबी'ला तक्रार केली. मध्यस्थाने रक्कम स्वीकारल्यावर अधिकार्याने १६ एप्रिल २0१४ रोजी आर्थर रोड जेल क्वार्टसमधील बुरकुले व पाथ्रीकर याच्या घरी छापा टाकला. पाथ्रीकर याच्याकडे एसीबीने पावडर लावलेल्या नोटा, तसेच नांदेड येथील एका बॅँकेत साडेबारा व पाच लाख रुपये भरल्याची कागदपत्र मिळाली. बुरकुले याच्याकडे २0 लाख, तसेच पाच लाखांची बॅँक ठेव पावती आणि साडेसात तोळे सोन्याचे दागिने सापडले. बुरकुले याच्या खिशात ७0 हजारांची रोकड आढळली. त्याचे कारण तो देऊ शकला नव्हता. दोघांविरुद्ध सबळ पुरावे : लाचखोर बुरकुडे व पाथ्रीकर यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. एसीबीच्या तपासातून या बाबी पुढे आल्या आहेत. लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्याबाबत सबळ पुरावे मिळाल्याने त्यांना नक्की शिक्षा होऊ शकेल, असे या प्रकरणाचा तपास करणार्या एसीबीच्या अधिकार्यांनी सांगितले. त्यासाठी खटल्याची सुनावणी लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 17 एप्रिलपासून दोघांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरोधातील आरोपपत्र न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात निलंबनाला वर्षाहून अधिक काळ होऊन गेला. त्यामुळे पी. ए. पाथ्रीकर याने त्याविरुद्ध 'मॅट'मध्ये याचिका दाखल केली होती.