अहमदनगर : दुष्काळाआड सहकार व ऊस उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र युती सरकारकडून आखले जात असल्याची टीका राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी केली आहे. दुष्काळी भागात ऊस लागवडीवर बंदी तसेच गरज पडल्यास यंदा साखर कारखान्यांच्या गाळपावर निर्बंध घालण्याची शक्यता कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे. त्यावर साखर उत्पादक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवारात उभ्या असलेल्या उसाचे काय करणार? त्या शेतकऱ्यांना सरकार मोबदला देणार आहे की, केवळ दुष्काळाआड सहकार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला संपविण्याचे षडयंत्र राबविले जात आहे, असा सवाल नागवडे यांनी केला. ते म्हणाले, की सरकारने आधी लोकांना पाणी आणि जनावरांना चारा पोहोचविण्याची व्यवस्था करावी. हंगामाला अद्याप अवकाश आहे. सरकार दुष्काळ योजना राबविण्यात अपयशी ठरत आहे. त्या मुद्द्यावरून राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ही नसती उठाठेव सुरू असल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)
दुष्काळाआड सहकार बंद पाडण्याचे षडयंत्र
By admin | Updated: September 3, 2015 00:47 IST