Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले पाहिजे या हेतूने प्रदेश काँग्रेसने राज्यात सद्भाव वाढीस जावा व महाराष्ट्र धर्म वाचावा यासाठी परळीत सद्भावना सत्याग्रह आयोजित केला होता, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात महाराष्ट्र धर्मावर होणारे आक्रमण हा चिंतेचा व गंभीर प्रकार आहे. हे आक्रमण थोपवून महाराष्ट्र धर्म वाचवण्याची गरज आहे. आपल्याकडे सद्भावना कमी होत चालली आहे. संतोष देशमुखांसारख्या सरपंचाची हत्या करण्यात आली. आपल्याच जातीच्या माणसाकडून दुकानातून माल खरेदी करा, असे सांगितले जाते, हे विदारक चित्र वाढीस लागले आहे, हे दुर्दैवी आहे. राज्यातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेसने सद्भावना वृद्धींगत व्हावी यासाठी सद्भावना यात्रा सुरु केली आहे. पहिली पदयात्रा मस्साजोग ते बीड अशी काढण्यात आली. यात्रेला सुरुवात करण्याआधी भगवानबाबा व नगद नारायणालाही साकडे घातले होते. सद्भावना सत्याग्रह करण्याआधी परळीच्या वैद्यनाथालाही साकडे घातले. महादेवाने जे अद्वैत दिले म्हणजे सद्भानेचा मंत्र दिला त्यांच्याच गावात सद्भावनेचा जागर घातला. आता राज्यातील प्रत्येक नागरिकांने सद्भावनेचा मंत्र जोपासला पाहिजे, असे आवाहन सपकाळ यांनी केले.
भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले
भाजपा युती सरकारच्या १०० दिवसांचे रिपोर्ट कार्ड सरकारने जाहीर करून गवगवा केला पण भाजपा युती सरकारच्या १०० दिवसात राज्याला काय मिळाले तर आका, खोके हे शब्द मिळाले आणि दुर्दैवाने हे दोन्ही शब्द बीड जिल्ह्यातून राज्याला मिळाले. राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत, शेतमाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिलेल्या सरकारने आता आम्ही असा शब्द दिलाच नाही असा पवित्रा घेतला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे तर लांबच राहिले १५०० रुपयेही दिले जात नाहीत. भाजपा युतीने निवडणुकीवेळी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. अवघ्या १०० दिवसात भाजपा युतीने जनतेची घोस फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
दरम्यान, सद्भावना यात्रेच्या पुढील टप्प्यात म्हणजे उद्या दिनांक ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा आयोजित करण्यात आली आहे तर ५ मे रोजी परभणीतच संविधान बचाव यात्रा आयोजित केली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.