Congress MP Praniti Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देऊ म्हटले होते. सगळी वचने दिली ती पूर्ण केली जात नाहीत. ही फसवणूक आहे. बीडमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे सगळे माहिती होते तरीही ते हसत खेळत होते. या सरकारला आतला आवाजच उरला नाही. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलीस कोठडीत झाली आहे. तरीही सरकारने काही केले नाही, अशी टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
मीडियाशी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आरोग्य व्यवस्था ढासळली असेल तर शासनाकडे त्याकडे लक्ष द्यायला हवे. साधे औषध घेतानाही लोकांचे हाल होत आहेत. आम्ही कधीपासून ही बाब सांगत आहोत. रुग्णालयात पैसे भरले नाहीत म्हणून महिलेचा जीव गेला. भाजपा आणि महायुतीचे दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.
अमेरिका, रशिया किंवा आपला देश सगळीकडे हिटलरशाही
अमेरिका, रशिया किंवा आपला देश. सगळीकडे हिटलरशाही चालू आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. संविधानाने दिलेले अधिकार हिसाकावून घेतले जात आहेत. जे व्यासपीठ बाबासाहेबांनी दिले ते राहिले नाही. तीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणूक होत नाहीत त्यातूनच संविधानाचा अपमान होतो. केंद्र सरकार असो की, राज्य सरकार ते संविधानाला मानत नाही. संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जात असल्याची आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि लोकशाही निर्माण केली आहे. संविधान आपण वाचवले पाहिजे. सत्ताधाऱ्यांचे विचार हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत. संविधान आणि बाबासाहेबांचा असा तिरस्कार केला जात असेल, तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की, लोकशाहीची चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. भाजपाने जेव्हा ४०० पार असा नारा दिला होता, तेव्हा कोणाला माहिती होते की, संविधान बदलण्यासाठी त्यांनी हा नारा दिला होता. पण त्यांचे पितळ उघडे पडले. बाबासाहेबांना मानणारे लोक जोपर्यंत आहेत, तोपर्यंत संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही. बाबासाहेब हे केवळ आपल्या देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी होते ही बाब विसरता येणार नाही, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.