Congress Harshwardhan Sapkal News: मीरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये काही संघर्ष निर्माण झाला होता. या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली मोर्चे काढण्याचे आले होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात तणाव आणि कटुता निर्माण झाली आहे. ती अजिबात योग्य नाही. ही कटुता आणि तणाव कमी करून संवाद वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाकडून आम्ही मराठी आम्ही भारतीय या भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे. विविध जाती धर्मांचे, वेगळवेगळ्या भाषा बोलणारे लोक आपल्या देशात गुण्यागोविंद्याने एकत्रितपणे राहतात. मुंबई आणि महाराष्ट्रात तर देशाच्या सर्वच भागातून नोकरी, धंद्याच्या निमित्ताने आलेले लोक एकत्रितपणे राहतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण केले जात आहेत. राज्य सरकारनेच हा वाद सुरु केला आहे. खासदार निशिकांत दुबेसारखे राज्याच्या बाहेरील भाजपाचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून या वादाला फोडणी देण्याचे काम करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी हा वाद निर्माण केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसतच आहे. महाराष्ट्राच्या हिताचे नाही त्यामुळे हा संघर्ष संपला पाहिजे. सर्वांनी एकोप्याने बंधुभावाने एकत्रित राहिले पाहिजे यासाठीचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेस कमिटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी मीरा रोडच्या नयानगर येथील अस्मिता क्लब येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मीरा भाईंदर परिसरातील मराठी आणि हिंदी भाषिक नागरिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.