आज परभणीच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांविरोधात भाजपामधून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी बिघडलेली केस आहे. त्यांना कायदे किती कळतात हे माहीत नाही, असा टोला लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे राहुल गांधींवर टीका करताना म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी बिघडलेली केस आहे. त्यांना कायदे किती कळतात हे माहीत नाही. राजकारणाचा अड्डाकरण्यापेक्षा त्यांनी समाजाला समजावण्याचे काम करावे. मात्र राहुल गांधी हे समाजात अशांतता पसरविण्याचे काम करीत आहेत. ही नौटंकी आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. परभणी प्रकरणावर बोलताना त्यांनी हे विधान केले.
दरम्यान, आज परभणीच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युप्रकरणावरून पोलीस आणि सरकारवर गंभीर आरोप केले होते. "सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो दलित असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खोटे निवेदन विधानसभेत दिले. मी सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटलोय. ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांनाही भेटलो. त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखविला. व्हिडीओ दाखवला. छायाचित्रे दाखवली. ही ९९ टक्के नाही, तर शंभर टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.