सांगली : लोकसभेची सांगलीची जागा काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या जागावाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेस सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते शुक्रवारी आक्रमक झाले. त्यांनी सांगलीतील काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकल्यामुळे नेत्यांची पंचाईत झाली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतून वसंतदादा आणि कदम घराण्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचेही स्पष्ट झाले. अखेर ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत कुलूप काढून वादावर पडदा टाकला.सांगलीत शुक्रवारी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. दुपारी दीड वाजता घोषणाबाजी करीत काँग्रेस भवनलाच टाळे ठोकले. काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील तातडीने तेथे आले. त्यांनी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, यासाठी प्रयत्न करूया, अशी समजूत काढली. यामुळे कार्यकर्ते शांत झाले. काही वेळानंतर शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस भवनचे कुलूप तातडीने काढले. कुलूप घालण्यावरून वसंतदादा गट आणि कदम गटातील मतभेद उघड झाले. घोषणाबाजीवरुनही दोन्ही गटात धुसफूस होती. दोन्ही गटात बराच वेळ खडाजंगी झाली.दादा घराण्याने पळ का काढला? - कदमसांगली राजू शेट्टींना देऊ नये, अशीच भूमिका मी पक्षाकडे मांडली आहे. परंतु, आता काँग्रेस भवनला टाळे ठोकून तमाशा करणाऱ्या दादा घराण्याने सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले? मंत्रीपद आणि ३५ वर्षांच्या खासदारकीनंतरही लोकसभेच्या मैदानातून दादा घराण्याने पळ का काढला, असा सवाल काँग्रेसचे आ. विश्वजित कदम यांनी केला.झारीतील शुक्राचार्य कोण?- विशाल पाटीलस्वाभिमानीला जागा सोडण्याची ‘सेटलमेंट’ केली तो झारीतील शुक्राचार्य कोण, हे सर्वांना माहीत आहे. वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिला. ही जागा सोडून भाजपाशी सेटलमेंट होत आहे का, असा सवालही त्यांनी केला.
‘काँग्रेस भवन’ला कार्यकर्त्यांकडून टाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:34 IST