कोल्हापूर : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारने सकारात्मक हालचाली सुरू केल्यामुळे शर्यतशौकीन व बैलगाडी मालकांतून आनंद व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे, त्यामुळे त्याला जंगली प्राण्यांच्या शर्यतीतून वगळण्यात येईल, शर्यतीतील क्रोर्य टाळण्याच्या अटीच्या अधीन राहून आठ दिवसांत ही परवानगी देण्यात येईल, असे जावडेकर यांनी सांगितले.गावोगावी होणाऱ्या शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने प्राणिमित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने शर्यतीवर बंदी घातली होती. या शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील बैलगाडी चालक-मालक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. या जंगली प्राण्यांच्या खेळ व प्रदर्शनास बंदी आणल्याने सर्कशीमधील प्राणी गायब झाले, तर दरवेशी समाजाच्या हातातील अस्वलही गेले. बैलगाडी शर्यतीमध्ये स्पर्धेतून बैलांचा छळ होत असल्याने प्राणिमित्र संघटनांनी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाचे वर्गीकरण जंगली प्राण्यात केले. त्यामुळे ११ जुलै २०११ला केंद्र शासनाच्या नव्या अध्यादेशात जंगली प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, तेंदवा, अस्वल, माकड यांच्याबरोबर बैलांचाही उल्लेख करण्यात आला. याचा आधार घेत प्राणिमित्र संघटना न्यायालयात गेल्याने शर्यतीवर बंदी आली होती. केंद्र शासनाच्या जंगली प्राण्यांच्या अध्यादेशातील बैलाचे वर्गीकरण कमी करण्यात यावे यासाठी विविध बैलगाडी मालक संघटनांनी न्यायालयात धाव घेण्याबरोबरच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपली कैफियत मांडली होती. दोन महिन्यांपूर्वी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची या संघटनेने कोल्हापूर येथे भेट घेऊन बैलाला जंगली प्राणी वर्गीकरणामधून वगळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. जावडेकर यांनी ही मागणी मान्य करून कायदा मंत्रालयाला तसे पत्र पाठविले आहे. आता कायदा मंत्रालयाकडून याला मंजुरी मिळताच बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा होईल. पण, शर्यतींमध्ये बैलांचा छळ होणार नाही, या व इतर काही अटी यासाठी पर्यावरण मंत्रालयाने घातल्या आहेत. (प्रतिनिधी)बैलगाडी शर्यती हा ग्रामीण भागामध्ये अत्यंत लोकप्रिय स्पर्धा प्रकार आहे आणि या स्पर्धेत बैलांना मारहाण न करता, विना लाठीकाठी स्पर्धा घेता येऊ शकते. केंद्र शासनाने या शर्यतींना मंजुरी द्यावी, या मागणीसाठी मी, खासदार सुप्रिया सुळे, आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जावडेकर यांना भेटलो होतो, या मागणीला आज, गुरुवारी यश मिळाले. यामुळे पुन्हा बैलगाडी शर्यती सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. - धनंजय महाडिक, खासदारकेंद्रातील भाजप सरकारतर्फे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाउले टाकून शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला आहे. यापुढे शर्यतीमध्ये बैलांचा छळ होणार नाही याची दक्षताही संघटनेमार्फत घेतली जाईल. - बाळासाहेब पाटील-टाकवडेकर, कार्याध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र छ. शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशन शिरोळ
बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी
By admin | Updated: December 5, 2014 00:21 IST