यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलिस अधिकाऱ्यांचे पगार, सुविधांचा दर्जा, निवासस्थानांची दुरवस्था यावर बरेचदा लिहिले जाते. संघटनांचा अधिकार नसलेला हा वर्ग सरकारवर दबावही आणू शकत नाही. अडचणी असल्या तरी कर्तव्य पार पाडत निवृत्त झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या नशिबी मृत्यूनंतर मात्र आता सन्मान येणार आहे.‘जिंदगी के साथ भी’बाबत पोलिसांचा खात्याविषयी अनुभव किती चांगला असतो हा विषय अलाहिदा पण ‘जिंदगी के बाद’ आमच्या संवेदना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत असतील असा संदेश देणारी एक कार्यपद्धती (एसओपी) पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निश्चित केली आहे. निवृत्त अधिकाऱ्यांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार, कुटुंबाला भावनिक आधार देणे यावर आधारित ही कार्यपद्धती आहे. अंत्यसंस्कारासाठी हार, फुलांसाठी २ हजार रुपये हे युनिट कल्याण निधीतून कुटुंबाला लगेच दिले जातील. वाहन/एस्कॉर्टची व्यवस्थाही करण्यात येईल. नेमकी कोणती मदत ? पोलिस महासंचालक दर्जाच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या अंत्यसंस्कारावेळी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जाईल. शोकसलामी दिली जाईल. कोणत्या दर्जाच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या अंत्यसंस्काराचे नियोजन कुटुंबाच्या मदतीने कोणत्या पदावरील अधिकाऱ्याने करावे हेही निश्चित करण्यात आले आहे. हे अधिकारी प्रतिनिधी अंत्यसंस्कारानंतर निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटंबाची भेट घेतील आणि वरिष्ठांचा लेखी शोकसंदेश त्यांना देतील.अधिकारी प्रतिनिधी हे अंत्यसंस्काराला पूर्ण गणवेशात उपस्थित राहतील. अंत्यसंस्कारावेळी संवेदनशील, आदरयुक्त वर्तन ठेवतील. निवृत्त अधिकाऱ्यांचा पत्ता, क्रमांक आदी माहिती अद्ययावत होईल. कुटुंबाला निवृत्तिवेतन/विम्याचे लाभ तत्काळ मिळावेत यासाठी मदत दिली जाईल. निवृत्त अधिकाऱ्याने आत्महत्या केलेली असेल किंवा अपकीर्ती झालेली आहे अशा पद्धतीने त्याचा मृत्यू झालेला असेल तर मात्र सन्मानपूर्वक अंत्यसंस्काराची जबाबदारी पोलिस विभाग घेणार नाही.
उपअधीक्षकांचा विसर निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या अंत्यसंस्कारांची आणि नंतर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठीची जी एसओपी जारी करण्यात आली आहे, त्या उपअधीक्षकपदाचा उल्लेख नाही. पोलिस महासंचालक/ अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक व खालच्या पदावरील अधिकारी यांचा उल्लेख आहे.