मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेला लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित याचा जामीन अर्ज गुरुवारी उच्च न्यायालयाने फेटाळला. राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) आरोपपत्राद्वारे पुरोहित याच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर केल्याने उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. मात्र विशेष न्यायालयात नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा पुरोहितला दिली. कर्नल पुरोहित गेले साडेसात वर्षे कारागृहात आहे. या दरम्यान त्याच्यावर खटला चालवण्यात आला नाही, या आधारावर पुरोहितने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारपासून पुरोहितच्या जामीन अर्जावर युक्तिवाद सुरू आहे. एनआयएच्या वतीने अॅड. संदेश पाटील यांनी पुरोहित आणि लेफ्टनंट कर्नल रमेश उपाध्याय यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंग एनआयएकडे उपलब्ध असून या संवादात हिंदू जागरण संघटनेचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने या संघटनेबाबत चौकशी केली का? अशी विचारणा अॅड. पाटील यांच्याकडे केली. खंडपीठाच्या या प्रश्नाला एनआयच्या वकिलांनी नकारात्मक उत्तर दिले.‘एटीएसने (महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथक) जरी या संघटनेबाबत चौकशी केली नसली तरी स्वतंत्र तपास यंत्रणा म्हणून तुम्ही (एनआयए) चौकशी केली पाहिजे,’ असे खंडपीठाने म्हटले.मालेगाव २००८ प्रकरणी एनआयएने १३ मे रोजी नव्याने आरोपपत्र दाखल केले असून आरोपींविरुद्ध ठोस पुरावे आहेत, अशी माहिती अॅड. पाटील यांनी खंडपीठाला दिली. एनआयएने नव्याने दाखल केलेले आरोपपत्र आणि आरोपींवरील मोक्का हटवल्याचे लक्षात घेत खंडपीठाने पुरोहितची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. परंतु, पुरोहितला याच आधारावर विशेष न्यायालयात नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याचे मुभा दिली. पुरोहितचे वकील अॅड. श्रीकांत शिवदे यांनी पुरोहितने साडेसात वर्षे कारागृहात खटल्याशिवाय काढल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणल्यावर खंडपीठाने विशेष न्यायालयाला त्याच्या जामीन अर्जावर सहा आठवड्यांत निकाल देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शुक्रवारीच पुरोहित विशेष न्यायालयात पुन्हा एकदा जामीन अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
कर्नल पुरोहितला दिलासा नाही
By admin | Updated: June 10, 2016 04:42 IST