शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

एकनाथ संभाजी शिंदे... माणसं जिंकणारा, माणसं जपणारा माणूस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 20:07 IST

CM Eknath Shinde: व्यक्ती एखादी गोष्ट मनात धरून बसत नाही. एखाद्याविषयी आकस बाळगत नाही किंवा डुख धरून बसत नाही. अशा प्रकारच्या निगेटिव्हिटीला त्यांच्या मनात अजिबात थारा नाही.

>> चिंतामणी भिडे

पत्रकारिता करत असताना अंगात एक विलक्षण रग असते. तुम्ही तरुण असाल, आदर्शवादी असाल तर वादग्रस्त ठरू शकतील अशा किंवा हितसंबंध दुखावले जातील, अशा बातम्या करताना तुम्ही फारसं मागेपुढे बघत नाही. कोणालाही शिंगावर घ्यायची तुमची तयारी असते. गेल्या पाच-सहा वर्षांत परिस्थिती फारच बदलली आहे, पण किमान २०१३-१४ पर्यंत तरी प्रसारमाध्यमांमधून अँटी एस्टॅब्लिशमेंट बातम्यांसाठी फारशी अडवणूक होत नव्हती.

...तर ही गोष्ट आहे २००६ ते ०८ या दोन वर्षांतली. २००० साली मी महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झालो. २००६ मध्ये तत्कालीन संपादक भारतकुमार राऊत यांनी माझ्याकडे ठाण्याची जबाबदारी सोपवली आणि मी ठाण्यातून रिपोर्टिंग करू लागलो. त्याहीवेळी महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता होती. एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी नुकतेच आमदार आणि त्यापाठोपाठ जिल्हाप्रमुख झाले होते. आनंद दिघे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर शिवसेनेचे ठाण्यात काय होणार, असा प्रश्न विचारला जात असतानाच शिंदे साहेबांनी नव्या-जुन्यांची मोट बांधून ठाण्यातील शिवसेनेला सावरलं होतं. स्वतः आमदार म्हणून ते २००४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते आणि पाठोपाठ त्यांची जिल्हाप्रमुखपदीही नियुक्ती झाली होती. आमदार व जिल्हाप्रमुख या दोन्ही पदांवर एकच व्यक्ती असण्याचं त्यावेळेपर्यंतचं शिवसेनेतलं ते एकमेव उदाहरण होतं. त्यामुळे त्यांच्या नावाचा ठाण्यात चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. याचा दुसरा परिणाम असा झाला की, नागरी समस्या, महापालिकेतील वादग्रस्त विषय याबाबतच्या काहीही बातम्या दिल्या की, त्याचा रोख शिवसेनेवर आणि पर्यायाने शिंदे साहेबांच्या दिशेने जाई. मटामधून त्या काळात सातत्याने अशा बातम्यांचा धडाका लागला होता. २००७ मध्ये तर एक खूप मोठं प्रकरण मटाने लावून धरलं होतं.

त्यामुळे मी ठाण्यातील शिवसेनेच्या निगेटिव्ह लिस्टमध्ये होतो आणि ठाण्यातील शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे, हे समीकरण तेव्हाही होतंच. अर्थात त्यांच्याशी थेट संपर्क त्यावेळी फारसा नव्हताच. माझाच असा नाही, त्या काळात एकूणच त्यांचा प्रसारमाध्यमांशी फारसा संपर्क नव्हता (आजही आपण बरं आणि आपलं काम बरं असाच त्यांचा खाक्या असतो, त्यामुळे ते कधीच स्वतःहून कोणाला फोन करत नाहीत, मीडियामध्ये पुढे पुढे करताना दिसत नाहीत. बातमी लावा म्हणूनही सांगत नाहीत आणि एखादी टीकात्मक बातमी का लावली, म्हणून विचारायलाही जात नाहीत. पण आज अनेक पत्रकारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत). २००८ मध्ये मी महाराष्ट्र टाइम्सचा राजीनामा देऊन प्रहारमध्ये रुजू झालो आणि ठाण्यातील बातमीदारीशी संबंध संपला. त्यानंतर शिवसेनाच काय, पण ठाण्यातील कुठल्याही राजकीय वर्तुळाशी संपर्क अथवा संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता. 

....या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे जाऊन त्यांच्यासमवेत काम करायला मिळेल, असं स्वप्नातही वाटणं शक्य नव्हतं. अन् अचानक २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर एके दिवशी शिंदे साहेबांचे स्वीय सहायक सचिन जोशी यांनी भेटायला बोलावलं. तोवर ठाण्यातल्या राजकीय - सामाजिक वर्तुळाशी माझा फारसा संपर्क राहिला नव्हता.

फारसा संपर्क राहिला नव्हता. सचिन मित्र असला तरी त्याच्याशीही अधनंमधनं बोलणं होत असे. त्यामुळे कशासाठी भेटायला बोलावलंय, याची कल्पना नव्हती. भेटल्या भेटल्या त्याने, साहेबांसाठी काम करणार का, असं विचारलं. तोवर मी प्रहारची नोकरी सोडून मराठी सिनेमांची प्रसिद्धी करणारी कंपनी सुरू केली होती. त्यामुळे मला नोकरीत रस नाही, नोकरी करण्याच्या मानसिकतेतून मी बाहेर पडलोय, असं स्पष्ट केलं. त्यावर, ही नोकरी नाही, तुला तुझ्या मनाप्रमाणे काम करता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आणि अशा प्रकारे शिंदे साहेबांसोबत काम करायला सुरुवात केली.

...आणि त्यांचे एक-एक गुण उलगडायला लागले

पहिलेछूट एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे ही व्यक्ती एखादी गोष्ट मनात धरून बसत नाही. एखाद्याविषयी आकस बाळगत नाही किंवा डुख धरून बसत नाही. अशा प्रकारच्या निगेटिव्हिटीला त्यांच्या मनात अजिबात थारा नाही. अन्यथा त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मला मिळालीच नसती. राजकारण्यांविषयी आपल्या मनात बरेच गैरसमज असतात. पण शिंदे साहेबांसमवेत काम करताना सर्व समज-अपसमज गळून पडायला सुरुवात झाली.

अत्यंत मितभाषी, मोजकंच बोलणारे आणि मुख्य म्हणजे समोरच्याचं सगळंच्या सगळं म्हणणं ऐकून घेणारे... राजकारण्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ असलेले हे तिन्ही गुण शिंदे साहेबांमध्ये आहेत आणि जोडीला आहे अथक परिश्रम करण्याची तयारी. यामुळेच नगरसेवकापासून ते आज नगरविकासमंत्री या महत्त्वाच्या पदापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. स्वत:कडे विषयाची कितीही माहिती असली तरी ते समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतात. मग समोरची व्यक्ती त्यांच्याच पक्षातला एखादा कार्यकर्ता असेल किंवा प्रशासनातला एखादा कर्मचारी असेल किंवा आयएएस-आयपीएस अधिकारी असेल. ते कधीच समोरचा बोलत असताना त्याचं म्हणणं तोडत नाहीत. मग ती व्यक्ती वयाने, अधिकाराने वा कर्तृत्वाने-अनुभवाने कितीही कनिष्ठ असली तरी. बैठकीतील त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून कधी कधी समोरच्याला असं वाटू शकतं की, त्यांचं लक्ष आहे की नाही, मी बोलतोय ते नीटपणे ते ऐकत आहेत की नाही? पण ही प्रचंड मोठी गुगली असते. 

बैठकीतला शब्द अन् शब्द ते मनातल्या मनात टिपून घेत असतात आणि प्रोसेस करत असतात. बैठक पुढे सरकत असताना मध्येच ते थोड्या वेळापूर्वी बोलून झालेल्या अधिकाऱ्याला ‘तुम्ही मगाशी जे म्हणत होतात, ते खरं म्हणजे असं नाही असं असायला पाहिजे, जमलं तर तसं करून बघा!’ असं म्हणतात आणि तो अधिकारी एकदम चमकतो. या मंत्र्यांसमोर काहीही रेटून नेता येणार नाही, याची जाणीव त्याला होते. शिंदे साहेबांनी केलेली सूचना योग्य असते, पण ते सांगण्याची त्यांची पद्धत मात्र, ‘हे असं करा’ ऐवजी ‘असं करून बघा’ अशी असते. अगदी त्यांच्या जवळच्या स्टाफमधील मंडळींशी बोलताना देखील ते अनेकदा ‘आपण असं केलं तर?’ असं विचारतात. खरं म्हणजे याची काही गरज नसते. एक तर ते ज्या स्थानी आहेत, तिथे त्यांचं म्हणणं डावलणं कोणाला शक्य होणार नाही. दुसरं म्हणजे अगदी ग्रास रूटवरून, संघर्ष करून, अनेक अनुभव गाठीशी बांधत ते इथवर आलेले असल्यामुळे अनेक गोष्टींची त्यांना सखोल माहिती आहे आणि त्यांची राजकीय बुद्धिमत्ता थक्क करणारी आहे. तरी देखील समोरच्याला मान देत, मोठेपणा देत, त्याला निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्याची त्यांची ही पद्धत आहे. माणसांना जिंकून घेण्याची त्यांच्याकडे विलक्षण हातोटी आहे.

शिंदे साहेबांसमवेत आज काम करणारी मंडळी गेली अनेक वर्षं त्यांच्यासोबत आहेत. माणसाच्या चांगुलपणाचं हे एक अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे. प्रत्येक वेळी स्वार्थच माणसाला बांधून ठेवतो, असं नाही. आज शिंदेसाहेब ज्या जागी आहेत, तिथे त्यांच्या जवळ असल्यामुळे अनेक अनुषंगिक लाभ मिळू शकतात आणि ते मिळवणारेही असतात. परंतु, केवळ या लाभांपोटी माणसं एखाद्याच्या बरोबर वर्षानुवर्षं राहात नाहीत. त्यासाठी त्या माणसात काहीतरी विलक्षण चांगलं असावं लागतं. राजकारणात इतकी वर्षं वावरूनही शिंदे साहेबांच्या आतला माणुसकीचा झरा अव्याहत वाहत आहे. याचा गैरफायदा घेणारेही बरेच आहेत. याची त्यांनाही जाणीव आहे, पण तरीही ते स्वतःला बदलत नाहीत.‘सत्ता आज आहे उद्या नाही, पण उद्या हातात काहीही नसलं तरी रस्त्यावर उभं राहिल्यावर चार माणसं भवती जमली पाहिजेत, हीच आपली कमाई,’ हे त्यांचं साधं-सरळ तत्त्वज्ञान आहे. करोनाच्या काळात त्यांनी किती लोकांना, किती प्रकारे मदत केली, याची गणती नाही. कोल्हापूर-सांगलीचा पूर असो वा केरळमधला, दुष्काळग्रस्त वा अवकाळी पावसाचा फटका बसलेला शेतकरी असो वा दररोज घरी, शाखेवर, मंत्रालयात कुठेही कोणीही गरजू भेटला तरी खिशात हात घालायला ते मागेपुढे बघत नाहीत. देता किती घेशील दो कराने अशी त्यांच्याबाबतीत लोकांची अवस्था आहे. करोनाच्या काळात तर त्यांनी अक्षरशः लोकांच्या घराघरात धान्य पोहोचवलं... एकदा नाही, कित्येकदा... अगदी दिवाळीपर्यंत हा दानयज्ञ चालू होता. पुन्हा स्वतःच्या तोंडाने कोणाला सांगणं नाही, मीडियासमोर येणं नाही, कॅमेरे सोबत घेऊन फिरणं नाही. सगळं बिनबोभाट.

वैद्यकीय मदत मागायला त्यांच्याकडे दररोज अक्षरशः रीघ लागते. प्रत्येकाला आपापल्या परीने ते नेहमीच मदत करायचे. कधी समोरच्याला थेट पैसे देऊन, कधी हॉस्पिटलला फोन करून बिलात सवलत मिळवून देऊन. प्रत्यक्ष बिल आणि मिळालेली सवलत यातील तफावत कशी भरून निघते, हे मात्र त्या मदत झालेल्या व्यक्तीला कधीच कळायचं नाही. वैद्यकीय मदतीसाठी लागणारी वाढती गरज बघून मग त्यांनी दोन-तीन वर्षांपूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली.

ठाण्यातील कोपरीमध्ये त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आता डेरेदार वृक्ष झाला असून राज्यभरात याच्या शाखा फोफावत आहेत. अक्षरशः कोट्यवधींची मदत या कक्षाच्या माध्यमातून गरजूंना झाली आहे. विनामूल्य अथवा सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी शिबिरांचं आयोजन, विनामूल्य शस्त्रक्रिया, रुग्णालयांकडे पाठपुरावा करून वीज बिलांमध्ये सवलत मिळवून देणं हे सगळं सहजपणे काही कोटींच्या घरात आहे. पण याची कधीही टिमकी त्यांनी वाजवलेली नाही. मीडियाने अद्याप या कामाची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.

कामाच्या बाबतीत समोरच्यावर ते कमालीचा विश्वास टाकतात. तुला सांगितलंय ना, मग ते पूर्ण करणं तुझं काम आहे, हे त्यांचं म्हणणं आणि तू ते योग्यरित्या करशील, हा त्यांचा विश्वास. त्यामुळे काम करताना एक प्रकारचा आत्मविश्वासही येतो आणि दडपणही येतो. दडपण अशासाठी की, आपल्या कामातल्या चुकीचे परिणाम त्यांना भोगावे लागणार असतात. पण तरीही ते समोरच्यावर विश्वास टाकतात. आजवर त्यांनी मला एकदाही ‘हा मुद्दा कुठून आला’, ‘याचा संदर्भ कुठून घेतलास’, ‘हे कुठून मिळवलं ते मला बघायचंय’, अशी विचारणा केलेली नाही. कधी कधी हे धोक्याचं, अडचणीत आणणारंही ठरू शकतं; पण ते टाकत असलेला हा विश्वासच अधिक चांगलं काम करण्याचं बळ आणि अधिकाधिक निर्दोष काम करण्याची प्रेरणा देत असतो.

....आणि त्यांच्या याच स्वभावामुळे माणसं त्यांच्याशी जोडली जातात ती कायमची!

(लेखक एकनाथ शिंदे यांचे माध्यम सल्लागार-समन्वयक आहेत)

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना