CM Devendra Fadnavis News: २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. परंतु, देवेंद्र फडणवीसभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लवकरच भाजपात पक्षांतर्गत बदल होणार आहेत. नवा राष्ट्रीय अध्यक्ष तसेच विविध राज्यांत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालीही सुरू आहेत. या घडामोडींच्या संदर्भात मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोकळेपणाने उत्तर दिले.
जिव्हाळा संस्थेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना अगदी दिलखुलास पद्धतीने उत्तरे दिली. आपण हे लक्षात घ्यायला हवे पाहिजे की, महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्याची रिस्क घेणे हे फक्त भाजपा आणि नरेंद्र मोदीच करू शकतात. कारण ज्या प्रकारे राजकीय गणिते असतात, म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री केले, तेव्हा हा प्रश्न निश्चित समोर आला असेल. त्यामुळे मला हे १०० टक्के माहिती आहे की, माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पक्षामुळेच आहे. त्यामुळे पक्ष जे सांगेल ते मी करेन. नेहमी सांगतो की, मला जर पक्षाने सांगितले की तुम्ही घरी बसा तर मी कोणताही प्रश्न न करता सरळ घरी बसेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला आवडेल का?
पक्षाने तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितले तर व्हाल का? की मुख्यमंत्रीच राहायला आवडेल? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पक्ष जे सांगेल ते करायचे. माझे नेहमी एक म्हणणे असते की मी मोठा झालो म्हणजे ही माझी क्षमता होती म्हणून नाही, तर माझ्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते. मग त्यामध्ये कदाचित माझ्यापेक्षाही चांगले असतील. त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली मला संधी मिळाली, पक्षाने दिली. त्यामुळे माझे ठाम मत आहे की, जर माझ्या पाठीमागचा भारतीय जनता पक्ष जर काढला तर मला जास्त कोणी विचारणार नाही. माझा असा गैरसमजही नाही की मी स्वत:चा पक्ष तयार करून काही मोठे काम करु शकतो. जर मी भारतीय जनता पार्टीशिवाय उभा राहिलो तर माझ्यासह सर्वांची डिपॉजिट जप्त होतील, अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, विद्यार्थी चळवळीत असताना राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. एक स्वयंसेवक म्हणून आपल्यापरिने समाजाला योगदान द्यायचे हे निश्चित केलेले होते. स्वयंसेवकाला जे सांगितले ते त्याने करायचे असते, असे विलास फडणवीस यांनी सांगून काही पर्याय ठेवला नाही. राजकारणात सहनशक्तीचा कस लागतो. संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी राजकारणातून मिळाली असे एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळ प्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. मागील पाच वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.