CM Devendra Fadnavis: शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. शासन भिकारी आहे, या कोकाटे यांच्या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून, विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
ते काय बोलले, ते मी ऐकलेले नाही. तथापि, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल, तर मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पीकविम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली. पीकविम्यात आपल्या लक्षात आले की, पीकविम्यात काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला, तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा कंपन्या घेत आहेत. म्हणून त्याची पद्धती बदलली. पण पद्धती बदलत असताना, आपण दुसरा निर्णय हादेखील घेतला की, शेतकऱ्याला मदत तर करूच; पण, त्यासोबतच ५ हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवू करू. त्याची सुरुवातही केली आहे. २५ हजार कोटी रुपये ५ वर्षांत शेतीमधील गुंतवणूक आपण वाढवत आहोत. त्यामुळे मला असे वाटते की, अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे
मी आजही सांगतो की, देशाच्या कुठल्याही राज्याच्या ज्याच्या अर्थव्यवस्था मोठ्या आहेत, त्या अर्थव्यवस्थांमध्ये आजही सगळ्यात चांगली, मी असे म्हणत नाही की, आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे खूप पैसा आहे; परंतु, तुलनेने विकसनशील अर्थव्यवस्थेत अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे. आपल्यासमोर आव्हानेही आहेत. पण तरीही आपण आपल्या अर्थव्यवस्थेतील वित्तीय तूट ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत. अनेक राज्ये कर्जांमध्ये २५ टक्क्यांच्या वर गेली आहेत, वित्तीय तूट ४ ते ५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची ही अवस्था नाही. त्यामुळे उपलब्ध साधनांचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातील जनांचे कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रश्न असा आहे की, राजीनामा देण्यासारखे घडले काय? एक व्हिडिओ, जो विरोधकांनी काढला, त्यांना तर मी कोर्टात खेचून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, त्यांनी माझी बदनामी केली आहे. खरे म्हणजे हा इतका छोटा विषय आहे. हा विषय एवढा का लांबला हे मलाही समजले नाही. यासंदर्भात मी आधीच खुलासा केला आहे. मला रमी खेळताच येत नाही. अशा प्रकारचा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. मी ऑनलाइन रमी खेळत असेन, मी जर दोषी सापडलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांपैकी कुणीही निवेदन करावे. त्या क्षणाला न थांबता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना न भेटता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.