मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या एक्टिव्ह मोडवर कार्यरत असून आज सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी ६ विभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत समाज कल्याण विभाग, पर्यटन, शालेय शिक्षण, पणन यासारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश होता. या बैठकीत सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा, पर्यटन पोलिसांची नेमणूक, शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याबाबतचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणार ऍग्रो हब
समृध्दी महामार्गालगत उभारण्यात येणारे ऍग्रो हब मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ऍग्रो हबसाठीचा आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त मागणी ही आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्यांनी केली.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूम शी जोडणार, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या असं मुख्यमंत्र्यानी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार
राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे
राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणा-या शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. राज्यातील महामार्गाची उभारणी तसेच रस्त्यांचे जाळे दर्जैदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे असं मुख्यमंत्री म्हणाले.
पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करणार
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीप सारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र (Excellence Centres) स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
डिजीटल माध्यम धोरण तयार करणार
शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क विभागाच्या बैठकीत सांगितले.