CM Devendra Fadnavis News:देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील अनेक नेते या विधानावर प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर भाष्य केले आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली.
विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
आगामी १०० वर्षे मलाच मुख्यमंत्री म्हणून ठेवतील
बावनकुळे यांच्या हातात असले तर ते आगामी १०० वर्षे मलाच मुख्यमंत्री म्हणून ठेवतील. पण त्यांच्या शुभेच्छांचा आपण मतीतार्थ समजून घ्यावा. त्यांनी माझ्या चांगल्यासाठीच मला या शुभेच्छा दिल्या आहेत. बाकी राजकारणात भूमिका बदलत असतात. या भूमिका बदललल्याही पाहिजेत. कोणीही फार दीर्घकाळ कोणत्याही पदावर राहत नाही. त्यामुळे माझी भूमिका जेव्हा बदलायची तेव्हा बदलेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. भाजपा नेते आहेत. भाजपाची सत्ता अविरत राहावी ही माझी मनापासूनची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही. एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे २०३४ काय त्यापुढे असले तरीही हरकत नाही, असे भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणालेत.