हितेन नाईक,
पालघर- आपल्याला स्वराज्य मिळावून देणाऱ्या व स्वराज्यासाठी शत्रूला लढा देत मजबूतीने आजही उभ्या असलेल्या गड, किल्ल्यांची दुर्गांची जोपासना करून तरूणामध्ये इतिहास दीर्घकाळ जागरुक रहावयासाठी सहयाद्री मित्रमंडळाचे शिलेदार मागील अनेक वर्षापासून अविरत झटत आहेत. या मंडळाच्या १७ शिलेदारांनी तांदुळवाडी किल्ल्याच्या संवर्धनासाठी श्रमदानातून त्यावरील पाण्याचा टाक्यांची साफसफाई करून किल्यावर दिशादर्शक व माहिती फलक लावले.सफाळे रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस पाच कि.मी. अंतरावर तांदुळवाडी किल्ला असून मराठयांनी इ.स. १७३७ साली हा किल्ला पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. या किल्ल्याच्या डोंगर माथ्यावर पाषाणात खोदलेले अनेक जलकुंभ असून तटबंदीच्या खुणाही आढळतात. शासनाचे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याची तटबंदी ढासळू लागली आहे. तर निवडुंगासह काटेरी झाडांचा विळखा किल्ल्याला बसू लागला होता. त्यामुळे पालघर तालुक्यातील सहयाद्री मित्रमंडळाच्या माकुणसार, मधाणे, नावझे , केळवे, माहिम, खारेकुरण येथील १७ तरूणांनी एकत्र येत गडाच्या उतारावरील दगड मातीच्या गाळाने भरलेल्या ७ फुटी टाक्या मधील गाळ उपसुन त्या स्वच्छ केल्या. यावेळी निवडुंग व काटेरी झाडांची साफसफाई करून वाटेवर दिशादर्शक मार्गातून मार्गक्रमण करता यावी म्हणून फलक लावले. यावेळी एक नवीन गडावरील ऐतिहासिक वाटेचा शोधही यामंडळातील तरूणांनी लावल्याचे मंडळाचे प्रमुख दिपक पाटील यांनी सांगितले.पुस्तकनिर्मितीचा मानसआगामी काळात तांदुळवाडी किल्ल्याची इंत्यभुत माहिती व इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्री दत्त राऊत यांच्या संशोधीत अभ्यासाखाली पुस्तक निर्मितीचा मानसही यावेळी करण्यात आला. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी राकेश पाटील, विराज ठाकूर, निकेश पाटील, आकाश पाटील, सर्वेश पाटील, साहिल पाटील, या सहयाद्री मित्रमंडळाच्या शिलेदारांनी नियोजनबध्द योगदान देत अधिकाधिक तरूणांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.