ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 7 - वडिलांना डुलकी लागली अन् आई लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधत धावत्या रेल्वेतून पावणेचार वर्षांच्या चिमुकलीचे एका महिलेने अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली. परंतु पुढचे स्टेशन येण्यापूर्वीच आईवडिलांनी अख्खी रेल्वे पालथी घालून आपल्या पोटच्या गोळ्यास एका महिलेच्या ताब्यातून अक्षरश: हिसकावून घेतले. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास मनमाड ते औरंगाबाद प्रवासादरम्यान तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडली. लोहमार्ग पोलिसांनी अपहरणकर्त्या महिलेस अटक केली. भीक मागण्यासाठी आरोपी महिलेने चिमुकलीला पळविल्याचे समोर आले. ईश्वरी रामेश्वर केंद्रे (वय पावणे चार वर्ष, रा. बदलापूर, उत्तर)असे चिमुकलीचे नाव आहे. अनामिका सुरेशराव मांझी (रा.कस्बा देहेरी, जि.अंसूल, झारखंड)असे अटक महिलेचे नाव आहे. चिमुकलीचे वडील आणि लोहमार्ग पोलिसांनी सांगितले की, रामेश्वर केंद्रे यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते पत्नी मुक्ता, मुलगी ईश्वरी आणि मुलगा रुद्र (२) यांच्यासह कल्याण (जि. ठाणे) येथून तपोवन एक्स्प्रेसने परभणीला निघाले होते. रविवारी सकाळी सात वाजता हे कुटुंब रेल्वेत बसले. सकाळी साडेअकरा वाजेनंतर गाडी मनमाड स्थानकातून औरंगाबादच्या दिशेने निघाली. तेव्हा रामेश्वर यांना ढुलकी आली. तेवढ्यात ईश्वरीला लघुशंका आल्याने आई तिला आणि तान्हुल्या रूद्रला घेऊन टॉयलेटकडे गेली. याचवेळी एका टॉयलेटमधून आरोपी महिला बाहेर पडली आणि बाजूला उभी राहिली. त्या टॉयलेटमध्ये प्रथम ईश्वरी जाऊन आली व बाहेर थांबली. त्यानंतर रुद्रला लघुशंकेसाठी घेऊन मुक्ता आत गेल्या. त्या बाहेर आल्यानंतर त्यांना ईश्वरी दिसली नाही. त्यांच्या डब्यातही ती नव्हती. त्या धावतच पतीकडे गेल्या आणि त्यांना झोपेतून उठविले. रामेश्वर आणि मुक्ता यांनी धावत्या रेल्वेत ईश्वरीचा शोध सुरू केला असता एका प्रवाशाने एक महिला चादरीत गुंडाळून एका मुलीस घेऊन गेल्याचे सांगितले. चौथ्या डब्यातून नेले दहाव्या डब्यातआरोपी महिलेने ईश्वरीला चादर आणि गोधडीत गुंडाळून चौथ्या डब्यातून दहाव्या डब्यात नेले. तेथे ती चिमुकलीस रडू नको, म्हणून दम देत होती. चिमुकलीचा शोध घेत तिचे आईवडील दहाव्या डब्यात पोहोचले, तेव्हा तेथे त्यांना अनामिकाजवळ ईश्वरी दिसली. मुक्ता यांनी झडप घालून ईश्वरीस तिच्या ताब्यातून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने घट्ट पकडून ठेवले. मुक्ता आणि रामेश्वर यांनी तिच्याकडून ईश्वरीला हिसकावून घेतले.
सतर्क मातेमुळे फसले मुंबईच्या बालिकेचे अपहरण
By admin | Updated: May 7, 2017 21:20 IST