जमीर काझी, मुंबईझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) कारभाराची दस्तरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी दुपारी अडीच वाजता वांद्रे येथील कार्यालयात भेट देऊन दीड तासाचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. यामध्ये एसआरएशी संबंधित महापालिका, म्हाडाकडील प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.जवळपास ५ वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री प्राधिकरणाच्या कार्यालयातील भेटीचे नियोजन केल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाली आहे. यापूर्वी २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्राधिकरणाला भेट दिली होती. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे एरव्ही साइटवर असल्याचे भासवून २-२ दिवस कार्यालयाला दांडी मारणारे अधिकारी धास्तावले आहेत. ट्रान्झिस्ट, जुन्या इमारतींचे पुनर्वसन आदी प्र्रलंबित कामांबाबत विचारणा होण्याच्या शक्यतेमुळे या विभागातील अधिकारी ‘चिंता’तूर झाले आहेत. पत्रकार माहिती घेण्यासाठी गेले असता, त्यांनी स्टाफ कामात असल्याचे सांगत तत्काळ माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.
मुख्यमंत्री आज घेणार ‘एसआरए’ची झाडाझडती
By admin | Updated: December 1, 2014 03:55 IST