मुंबई - मी सरकारमध्ये असतानाच चॅलेंज करतो. मी सरकारलाही सांगितले. जिथे बोलायचे तिथे मी बोलतोय. मी मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाही असं विचारले जाते. परंतु मी माझे नेते अजित पवारांना सांगितलंय. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल छगन भुजबळांची अडचण होतेय. सरकारमध्ये अडचण होतेय. तुम्ही फक्त एक मेसेज पाठवा आणि माझा राजीनामा घ्या..हे मी आता सांगितले नाही तर जेव्हा अंबडला ओबीसींची सभा होती. त्या सभेअगोदर सांगून मी अंबडला गेलो असं विधान मंत्री छगन भुजबळांनी केले आहे.
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरा करतायेत.ठिकठिकाणी सभा घेत ते सरकारला अल्टिमेटमची आठवण करून देतायेत.पण त्याचसोबत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. भुजबळांनी जालनातील अंबड येथे सभा घेत मराठ्यांना ओबीसीत घेतल्यास परिणाम वाईट होतील असा इशारा दिला होता.त्यामुळे राज्यात मराठा-ओबीसी असा वाद निर्माण झाला. त्यात भुजबळांच्या भूमिकेमुळे सरकारमध्येच आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.भुजबळांच्या विधानावरून जरांगे यांनी सरकार भुजबळांना पाठिशी घालतंय का असा प्रश्न विचारला. आता या संपूर्ण प्रकरणावर भुजबळांनी जर माझ्यामुळे सरकार अडचणीत येतंय असं वाटत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं थेट उत्तर दिले आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आमदारकी, मंत्रिपद हे आयुष्यात सर्वस्वी नाही. मंत्रिपदाने शिंगे फुटत नाही. ३५ वर्ष आमची ओबीसींसाठी लढाई आहे. मराठ्यांना आरक्षण द्या त्यांना विरोध नाही. परंतु आमचे आरक्षण टिकवा यासाठी आम्ही लढतोय. काही लोकांना मिळणारे शिक्षण, नोकरीतील आरक्षण जाणार. ओबीसींचा डेटा अपडेट नाही. केंद्र सरकारचा निधी ओबीसींना मिळत नाही. रात्री-बेरात्री सभा घेतल्या जातायेत, मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना विचारा. माझी लायकी काय, मी माळी आहे, दलित एसपी होतो, कारण त्याची लायकी नाही. सुतार, माळी, वंजारी यांच्या हाताखाली कामं करणे गुन्हा आहे हे नवीन तयार झाले. कोणी बोलायला तयार नाही. आमची लायकी नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांवर भुजबळांनी पलटवार केला.
दरम्यान, सर्व नेते म्हणताये, ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण द्या. जरांगे पाटलांनी उपोषण केले. सुरुवातीपासून मला टार्गेट केले. मला रोज वेगवेगळे मेसेज येत होते. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, ओबीसीत ३७५ जाती झाल्या, कुणाला त्यात काय मिळणार म्हणून मराठा समाजाला वेगळे असे आरक्षण द्या असं मी म्हटलं. हायकोर्टाने कायदा मान्य केला, सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्यात काही दोष दूर करा, मी वेगळी भूमिका मांडली नाही. राज्यातील सर्व नेते ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या असेच भूमिका मांडतायेत. मला सातत्याने शिव्या देणे चालू आहे. पण नंतर आमदारांची घरे जाळली. प्रकाश सोळुंखे, सुभाष राऊत यांची घरे जाळली, राखरांगोळी काय असते हे ते मी पाहिले. एका दिवसात अख्खं बीड पेटलं. संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, राष्ट्रवादी भवन जळून खाक झाले. त्यांच्या घरात लेकरं-बाळं नव्हती का? पोलिसांनी का बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे मग मी उठलो आणि सभा घेतली असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.