लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. दरम्यान, छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, जोपर्यंत सूरज चव्हाण यांना अटक होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
रविवारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना लातूरच्या विश्रामगृहात बेदम मारहाण झाली होती. तत्पूर्वी पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते फेकत निवेदन दिले होते.