महिला आयोगासमोर चव्हाणांची साक्ष

By Admin | Updated: May 25, 2014 05:40 IST2014-05-25T05:40:52+5:302014-05-25T05:40:52+5:30

बदनामीच्या आरोपाखाली दाखल तक्रारीवर डोंबिवली भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची राज्य महिला आयोगाकडे नुकतीच साक्ष नोंदवली.

Chavan's testimony before the Women Commission | महिला आयोगासमोर चव्हाणांची साक्ष

महिला आयोगासमोर चव्हाणांची साक्ष

कल्याण : बदनामीच्या आरोपाखाली दाखल तक्रारीवर डोंबिवली भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची राज्य महिला आयोगाकडे नुकतीच साक्ष नोंदवली. स्वपक्षातील नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या अर्चना कोठावदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपद निवडणुकीच्या दोन दिवस आधी कोठावदे बेपत्ता झाल्याने त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार आमदार चव्हाण यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात केली होती. परंतु, दुसर्‍याच दिवशी आपले कुणीही अपहरण केले नसून केवळ बदनामीपोटी अपहरणाची खोटी तक्रार आमदारांनी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेऊन आमदार चव्हाण यांच्यासह व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आपली बदनामी करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. कोठावदे यांनी आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. या तक्रारीवरून आमदार चव्हाण यांचा नुकताच महिला आयोगाने जबाब नोंदवून घेतला. निवडणुकीच्या धर्तीवर पक्षाचा व्हीप बजावण्याची कार्यवाही केली होती. याबाबत आयोगाकडे आपली बाजू मांडल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान उपस्थित राहणे गरजेचे असतानाही कोठावदे अनुपस्थित राहिल्या. आयोगाचे पत्र उशिरा प्राप्त झाले, त्यामुळे उपस्थित राहता आले नाही, असा दावा कोठावदे यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Chavan's testimony before the Women Commission