शिवाजी गोरे - दापोली -डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, विस्तार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे अल्पावधीतच कोकण कृषी विद्यापीठाने देशातील नामवंत कृषी विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले. आज देशातील कृषी विद्यापीठातील नंबर एकचे कृषी विद्यापीठ म्हणून कोकण कृषी विद्यापीठाकडे पाहिले जाते. परंतु या विद्यापीठात कुलगुरुपासून सहयोगी अधिष्ठातापर्यंतची महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. या प्रभारी कारभाराच्या धोरणामुळे विद्यापीठाच्या कारभारावर मोठा परिणाम होत आहे.डॉ. किसन लवांडे १९ डिसेंबर २०१४ रोजी कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झाले. त्याआधीच नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरु झाली. ३ महिने अगोदर ही प्रक्रिया सुरु झाल्याने डॉ. लवांडे सेवानिवृत्त होण्यापूर्वी नवा कुलगुरु मिळण्याची आशा होती. परंतु निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरु पदासाठी एकही उमेदवार पात्र नसल्याचा शेरा मारल्याने विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळाला नाही. या पदाचा अतिरिक्त कार्यभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. कुलगुरुप्रमाणेच विद्यापीठात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे कुलसचिव पदही रिक्त आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. विद्यापीठातील संशोधन संचालक, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक ही महत्त्वाची पदे भरली नसल्याने या पदांचाही अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. कृषी विद्यापीठातील बांधकामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र बांधकाम विभाग आहे. बांधकाम विभागातील विद्यापीठ अभियंता पदही रिक्त असल्याने त्याचा कार्यभार अन्य व्यक्तीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, फलोद्यान महाविद्यालय, काढणीपश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर महाविद्यालय या महाविद्यालयांतील सहयोगी अधिष्ठाता पदेही रिक्त आहेत.महत्त्वाची पदेही रिक्तचडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील महत्त्वाच्या सर्वच पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याने त्या व्यक्तिला स्वत:च्या पदाला न्याय देता येत नाही व अतिरिक्त पदही दुर्लक्षित राहाते. एका व्यक्तीकडे अनेक पदे असल्याने पूर्ण क्षमतेने काम होत नसून, कृषी विद्यापीठातील अतिरिक्त पदामुळे अनेक महत्त्वपूर्ण कामांना खीळ बसण्याची भीती आहे.कोणत्याही विद्यापीठाच्या कुलगुरुंची भूमिका पालकासारखी असते. परंतु डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सध्या पालकच नाहीत. परभणी कृषी विद्यापीठाचा कार्यभार सांभाळून दापोलीकडे लक्ष देणे सोपे काम नाही. भौगोलिकदृष्ट्या त्यांना दापोलीत वारंवार येणेही त्रासदायकच आहे.
कृषी विद्यापीठच बनलेय प्रभारी
By admin | Updated: April 1, 2015 00:14 IST