राकेश घानोडे, नागपूरएखाद्याचे सार्वजनिकरीत्या चारित्र्यहनन करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होय, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना नोंदविला आहे. चारचौघांसमोर चारित्र्यहनन करणे ही संबंधित व्यक्तीच्या मनाला खिन्न व वैफल्यग्रस्त करणारी कृती आहे. चारित्र्यहननानंतर समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहील असा विचार करून ती व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकते, असे निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिकरीत्या अनैतिक संबंधाचा आरोप करण्यात आल्याने एका ग्रामीण अविवाहित मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केली होती. न्या. सुनील शुक्रे यांनी प्रकरणातील आरोपी दाम्पत्याचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना यासंदर्भात विस्तृत खुलासा केला आहे. चारित्र्यावरील बेपर्वा, धक्कादायक व मानहानी करणारे आरोप कोणत्याही अविवाहित मुलीला निराशेच्या खाईत ढकलण्यास पुरेसे आहेत. आरोप सार्वजनिकरीत्या करण्यात आल्याने, आरोप करणारा पुरुष विवाहित असल्याने व आरोपांचे स्वरूप समाजातील प्रतिमा मलीन करणारे असल्यामुळे त्या मुलीची केवळ विवाहाची संभावनाच कमी झाली नव्हती तर, तिचे समाजात ताठ मानेने जगणेही कठीण झाले होते, असे न्या. शुक्रे यांनी म्हटले आहे.
चारित्र्यहनन हे आत्महत्येस प्रवृत्त करणारे
By admin | Updated: February 23, 2015 02:31 IST