अहमदनगर - साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे़ शासनाने हा राजीनामा स्वीकारला आहे़. आपल्याला वयाची ७० वर्षे पूर्ण झाली असल्याने आपण संस्थानच्या उपाध्यक्षपदाचा व विश्वस्तपदाचा राजीनामा देत असल्याचे कदम यांनी विधी व न्याय विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे़ विश्वस्त मंडळाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती़ यावर राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश वासंती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती़ त्यात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांचाही समावेश होता़ या दाव्याची सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ दोन दिवसापूर्वी (दि.४ मार्च) न्यायालयाने राज्य शासनाला न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या अहवालावर निर्णय घेण्यास सांगितले होते़ पुढील सुनावणी १२ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.समजलेल्या माहितीनुसार कदम यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती़ त्यांच्यावर मुळा धरणातून कालव्यांना जबरदस्तीने पाणी सोडण्याबाबत गुन्हा दाखल आहे़ त्या संदर्भात अहवालात उल्लेख असल्याने त्यांची गच्छंती अटळ होती़ त्या पार्श्वभूमीवर कदम यांनी वयाचे कारण सांगत राजीनामा दिला आहे़ या संदर्भात कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही़ येत्या जुलै २०१९ मध्ये या विश्वस्त मंडळाची मुदत संपत आहे़ कदम यांच्या राजीनाम्याबाबत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांना विचारले असता त्यांनी कदम यांचा राजीनामा स्वीकृत झाल्याचे पत्र शासनाकडून बुधवारी सायंकाळी ई-मेलद्वारे प्राप्त झाल्याचे सांगितले़
साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 22:57 IST