ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकांस केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी दिल्लीत केली.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने 'छत्रपतींचा आशीर्वाद, चले चलो मोदी के साथ' अशा प्रकारचे बॅनरबाजी केल्याने शिवसेना-भाजपामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. छत्रपतींचा आशीर्वाद शिवसेनेच्याच पाठीमागे आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने शिवस्मारकाला परवानगी देत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अरबी समुद्रात ३०९ फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. दरम्यान, बैलगाडी शर्यतीला केंद्राकडून परवानगी देण्यात येत असल्याने शंकरपटाचा नाद पुन्हा एकदा अनुभवयास मिळणार आहे. राज्याच्या अनेक कानाकोप-यात बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये उत्सूकता असते परंतू राज्यात यावर बंदी घालण्यात आल्याने अनेक शेतक-यांचा हिरमोड झाला होता. परंतू आता पुन्हा एकदा शेतक-यांना बैलगाडयांची शर्यत अनुभवायाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे जावडेकर म्हणाले.