अतुल कुलकर्णी- मुंबईउसाला चांगला भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारकडून कर्ज घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यातील ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विस्ताराने चर्चा केली. मुख्यमंत्री स्वत: पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार खात्याचे सचिव राजगोपाल देवरा होते.‘लोकमत’शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे मुंबईत येणार होते. त्यांना ऊस आणि साखरेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटण्याचे ठरले होते. मात्र पासवान यांचा दौरा रद्द झाला. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोणते पर्याय असू शकतात, याची विस्ताराने चर्चा करण्यासाठी आपण स्वत: पवार यांच्याकडे गेलो होतो. पवार यांच्याशी बोलताना केंद्राकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. शिवाय जेवढी साखर आवश्यक आहे, तेवढेच उत्पादन करण्यात यावे आणि इथेनॉलसारख्या अन्य पर्यायांचादेखील विचार करावा, यावर या बैठकीत चर्चा झाली. पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री पासवान यांना भेटण्यासाठी राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे. म्हणूनच आपण हे पाऊल उचलल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
उसासाठी केंद्राकडून कर्ज घेणार-मुख्यमंत्री
By admin | Updated: December 28, 2014 01:19 IST